त्या काळरात्रीची सकाळ अजूनही उजाडलीच नाही!

0

काल रविवार 3 डिसेंबर. अजून एक 3डिसेंबर मागे पडला. पण 33 वर्षांपूर्वी याच दिवशी एक काळरात्र होत्याचे नव्हते करून गेली आणि अजूनही तिची सकाळ उजाडलेली नाही. 2 डिसेंबर 1984 हा दिवस नेहमी सारखाच एक सामान्य दिवस होता. पूर्ण दिवसभरात लोक आपली दैनंदिन कामे करत होती. याच दिवसाच्या रात्री एका मरणाची झुळूक येईल आणि हजारो लोकांचा जीव घेईल, असा विचारही कोणाच्या मनात आला नसेल. पण मध्य प्रदेशाची राजधानी भोपाळमधील पुराने शहर नावाने ओळखल्या जाणार्‍या भागात 2 आणि 3 डिसेंबरच्या मध्यरात्री युनियन काबाइडच्या प्लॉट नंबर सीमधील टँक क्रमांक 610 मध्ये असलेल्या मिथिल आयसोसायनेट या विषारी वायूत पाणी मिसळायला सुरुवात झाली.

या वायूचा वापर करून सेवीन नावाचे कीटकनाशक कंपनी तयार करत असे. पाणी मिसळल्यामुळे त्या वायूत रासायनिक प्रक्रिया व्हायला सुरुवात झाली. 3 डिसेंबरच्या सकाळपर्यंत तयार झालेल्या दाबामुळे तो टँक खुला झाला अन् विषारी मिथाईल वायू हवेत मिसळला गेला.
सूर्य उगवायला काही तासांचा अवधी असताना ती विषारी हवा आजूबाजूच्या परिसरात फैलावली आणि रात्री शांतपणे झोपी गेलेले हजारो लोक पुन्हा उठलेच नाही. या लोकांना काळझोप देण्यासाठी केवळ तिन मिनिटे लागली. त्या तीन मिनिटांची वेदना आजही हजारो लोकांना हळूहळू मृत्यूच्या जवळ नेत आहे.

भोपाळ गॅसगळती दुर्घटना ही औद्योगिक वसाहती असलेल्या शहरांमध्ये घडलेली सर्वात मोठी दुर्घटना. या मोठ्या रासायनिक दुर्घटनेत सुमारे साडेपाच लाख लोक प्रभावित झाली होती. त्यात 22 हजार लोकांचा मृत्यू झाला होता. सुमारे दीड लाख लोकांना कायमचे अपंगत्व आले होते. आज या दुर्घटनेला 33 वर्षे उलटून गेली असतानाही या शहरातील तिसरी पिढी त्याचे वाईट परिणाम भोगत आहेत. या पिढीवरही त्याचा असर झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. 2009 साली नारायणन नावाच्या एका एनजीओने अहवाल तयार केला होता. त्या अहवालात भोपाळ वायूगळतीमधील गॅसमध्ये इतर क्लोरिन कीटकनाशकांच्या तुलनेत 560 पटींहून जास्त विषारी आणि जीवघेण्या कीटकनाशकांचा वापर करण्यात आला होता.

या वायूगळतीसाठी जबाबदार ठरवलेल्या युनियन काबाइडच्या वॉरेन एन्डरसन याला न्यायालयाने 2100 डॉलर्स रकमेच्या जामिनावर मोकळे केले होते. भोपाळ पीडितांसाठी नुकसानभरपाई म्हणून न्यायलयाच्या बाहेर 470 दशलक्ष डॉलर्स रकमेचा समझोता करण्यात आला. पण प्रत्यक्षात ही रक्कम माणशी 3.3 डॉलर्सएवढीच असल्याचे सांगितले जाते.
याप्रकरणी न्यायालयीन सुनावणी, वेगवेगळी चौकशी आयोग वगैरे नेमण्यात आले. पण दोषींना मात्र अजूनही त्याची शिक्षा मिळालेली नाही. दरवर्षी 3 डिसेंबरला दोषींना सजा देण्याचे, पीडितांना मोबदला देण्याचे वादे केले जातात. पण 3 डिसेंबर उलटून गेल्यावर हे सगळे पुन्हा दफन केले जाते आणि पुन्हा त्याची कबर नवीन वर्षात उघडली जाते.

-विशाल मोरेकर
जनशक्ति प्रतिनिधी, मुंबई