नवी दिल्ली: राजस्थानविरुद्धच्या सामन्यात महेंद्रसिंह धोनीने पंचशी वाद घातल्याचा प्रकार घडला. त्यामुळे धोनीला शिक्षा देखील झाली आहे. धोनीच्या मानधनात ५० टक्के कपात झाली आहे. दरम्यान धोनीच्या त्या कृत्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. धोनीच्या या वागण्यावर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन, ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू मार्क वॉ, भारताचे माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा व संजय मांजरेकर यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.
काल झालेल्या राजस्थानविरुद्धच्या सामन्यात अखेरच्या षटकात तिसरा चेंडू बेन स्टोक्सने फुलटॉस टाकला आणि पंचांचा हात नो बॉलच्या इशाऱ्याकडे गेला. मात्र पंचांनी हात आखडता घेत नो बॉलचा निर्णय मागे घेतला. यामुळे मैदानाबाहेर उभा असलेला धोनी मैदानात घुसत पंचांना या कृतीचा जाब विचारला. चेन्नईला तीन चेंडूंत 6 धावांची गरज होती. यावेळी स्टोक्सने फुलटॉस चेंडू टाकला. यामुळे पंचांनी नो बॉलची खून केली. मात्र, दुसऱ्या पंचांनी यास नकार देताच त्यांनी हात मागे घेतला. यावर धोनीने आक्षेप घेतले.