‘त्या’ गावांना दुष्काळसदृश यादीतून वगळले

0

पुणे : राज्यातील बहुतांश जिल्ह्यात सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. तर अनेक ठिकाणी खरीप हंगामच वाया गेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केला जावा, अशी मागणी सर्व स्तरातून होत होती. सहकारमंत्री चंद्रकांत पाटलांनी दुष्काळ जाहीर करण्यासाठी 31 ऑक्टोबरचा मुहूर्त शोधला होता, परंतु सरकारच्या कारभारावर सर्वच राजकीय पक्षांसह शेतकरी संतप्त झाले असल्याचे मुख्यमंत्र्यांना लक्षात आले आणि त्यांनी राज्यातील 180 तालुक्यांत दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करून आम्ही शेतकर्‍यांसमवेत असल्याचे गाजर दाखवले. दरम्यान, या दुष्काळ सदृश यादीत पुणे जिल्ह्यातील 10 तालुक्यांचा समावेश करण्यात आला असला, तरी ज्या तालुक्यांत खरोखरच दुष्काळी परिस्थिती आहे ते तालुके यातून वगळण्यात आल्याने शेतकर्‍यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर व खेडचा यात समावेश नाही.

जुन्नरमध्ये भाताचे उत्पादन घटणार

जुन्नरच्या आदिवासी भागात भात पिक काढण्याची लगबग सुरू आहे. अखेरच्या टप्प्यात भात पिकाकडे पावसाने पाठ फिरवली. यामुळे उत्पन्नात 40-50 टक्के तर काही ठिकाणी 80 टक्के घट होण्याची शक्यता आहे. पावसाअभावी तोंडावर आलेला रब्बी हंगामही वाया जाणार आहे. मागील काही दिवसांपासून भात काढणीची कामे सुरू झाली मात्र उत्पादन कमी मिळण्याच्या भीतीने बळीराजा चिंतातूर झाला आहे. यावर्षी भाताच्या ओंब्या पूर्णपणे भरल्या नाहीत. त्यात दाणे चांगले न भरल्याने पाकडाचे प्रमाण जास्त आहेत. यामुळे शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

शिरुर, दौंडमध्ये सर्वात कमी पाऊस

जिल्ह्यात यंदा पाऊस कमी पडल्याने दुष्काळीस्थिती निर्माण झाल आहे. गेल्या 15 दिवसांपूर्वीच राज्याच्या कृषी विभागाच्या वतीने तालुकास्तरावर प्राथमिक दुष्काळी अहवाल तयार करण्यात आला होता. अहवालानुसार पुणे जिल्ह्यातील 10 तालुक्यांचा समावेश आहे. या तालुक्यांमध्ये यंदा पाऊसमान कमी झाले आहे. त्यात सर्वांत कमी पाऊस शिरुर आणि दौंड तालुक्यात पडला आहे. या दोन्ही तालुक्यात सरासरीच्या 58 टक्के कमी पाऊस झाला आहे. त्या खालोखाल बारामती तालुक्यात सरासरीपेक्षा 45 टक्के कमी पाऊस पडला आहे. तर इंदापूरमध्ये 42.24 टक्के कमी पाऊस झाला आहे. वेल्हे आणि पुरंदरमध्ये अनुक्रमे 34 आणि 23 टक्के कमी पाऊस झाला आहे. हवेलीमध्ये 31 टक्के कमी तर आंबेगावमध्ये 27 टक्के कमी पाऊस झाला आहे. याशिवाय भोर तालुक्याच्या काहीच भागात कमी पाऊस झालेला आहे. तर मुळशी तालुक्यातील फक्त पौडमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला आहे.

रब्बी हंगामही धोक्यात

असमाधानकारक भातपिकामुळे जुन्नर तालुक्यातील आदिवासी शेतकर्‍यांत नाराजीची भावना आहे. पूर्व भागात टँकरची मागणी करण्यात आली. खरीप हंगामात उत्पादन घटले तर रब्बीचा हंगाम धोक्यात सापडला आहे. खरीप हंगामातील भात, सोयाबीन, भुईमूग पिकांचे भवितव्य धोक्यात आल्याने कर्जाचा डोंगर डोक्यावर घेतलेला कष्टकरी बळीराजा संकटात सापडला आहे. पुणे जिल्ह्यात सर्वच तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना जुन्नर तालुका वगळण्यात आल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

शेतकरी संकटात

भात पिक चांगले आले तरच आदिवासीं शेतकर्‍यांचे वर्ष आर्थिकदृष्टया चांगले जाते. यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत उत्पादन कमी होणार आहे. भात साळींचा दर्जाही चांगला नसल्याचे सांगण्यात येते. या भागात भाताच्या इंद्रायणी, रायभोग आणि खडक्या आंबेमोहोर या प्रसिद्ध सुवासिक जातींचे उत्पादन घेतले जाते. भात काढणीनंतर रब्बी हंगामात वाटाणा, हरभरा अशी कडधान्याची पिके खाचरातील पाण्याच्या ओलीवर घेतली जातात. मात्र, ओलच नसल्याने यावर्षी ही पिके घेता येणार नाहीत. त्यामुळे जुन्नर तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

दुष्काळग्रस्त तालुके

आंबेगाव, बारामती, भोर, दौंड, हवेली, इंदापूर, मूळशी, पुरंदर, शिरुर, वेल्हे या 10 तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे.