जळगाव। बुधवारी शहरात एकाच क्रमांकाच्या दोन चारचाकी आढळुन आल्यामुळे बुधवारी एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, यातील एक चारचाकी मुळ मालकाकडून फायनान्स कंपनीने जप्त केल्यानंतर तीची चक्क विना रजिस्ट्रेशन विक्री झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. यासोबत फायनान्स कंपनीने ज्या व्यक्तीस चारचाकी विक्री केली त्या व्यक्तीजवळ न राहता ती दुसर्या व्यक्तीच्या ताब्यात असल्याचेही समोर आले आहे. महाबळ परिसरात राहणारे याज्ञिक हे बुधवारी दुपारी 3 वाजता दुचाकीने घराकडे जात होते. दरम्यान, त्यांना पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या समोर एमएच 19 बीव्ही 5535 क्रमांकाची चारचाकी (सफेद रंगाची) उभी असल्याचे दिसले. याज्ञिक यांच्या चारचाकीचा (निळ्या रंगाची) क्रमांक देखील हाच आहे. गोंधळात पडलेल्या याज्ञिक यांनी घरी फोन करून चारचाकीचा क्रमांक विचारून खात्री केली होती. या प्रकरणात दुसरी चारचाकी नरेंद्र विठ्ठल वारके (रा.चंद्रप्रभा कॉलनी, रिंगरोड, जळगाव) यांच्या ताब्यात असल्याचे समोर आले. वारकेंकडे चारचाकीच्या संदर्भात कोणतेही कागदपत्र नसल्यामुळे त्यांना जिल्हापेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर याज्ञिक यांना गुरूवारी चारचाकी परत करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक गजानन राठोड तपास करीत आहेत.
सन 2013 मध्ये ही चारचाकी सर्वप्रथम शेंदूर्णी येथील ऋषीकेश गोपाळराव गरुड यांनी खरेदी केली. गरूड यांनी एका फायनान्स कंपनीकडून कर्ज घेत चारचाकी खरेदी केली होती. मात्र, ठरल्या वेळेत गरुड यांनी कर्जफेड केली नाही. त्यामुळे चारचाकीवरील कर्ज, व्याज वाढत गेले. या कारणामुळे 8 जून 2015 रोजी फायनान्स कंपनीने गरूड यांच्या ताब्यातील चारचाकी जप्त केली. त्यानंतर नियमानुसार फायनान्स कंपनीच चारचाकीची मालक होती.
चारचाकी विक्री करण्यासाठी फायनान्स कंपनीने 29 सप्टेबर 2016 रोजी स्थानिक वृत्तपत्रातून जाहिरात दिली आहे. त्या जाहिरातीमध्ये ‘विना रजिस्ट्रेशन’ असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यानंतर 2 फेब्रुवारी 2016 रोजी राजीव रामदास महाजन (रा.श्रीहरीनगर, गणेश कॉलनी) यांनी ही चारचाकी फायनान्स कंपनीकडून खरेदी केली. खरेदीच्या कागदपत्रांमध्ये चारचाकीचे चेचीस व इंजिन क्रमांक आहेत. मात्र पासिंग क्रमांक नाही. आता महाजन यांच्याकडून चारचाकी तात्पुरती वापरण्यासाठी घेतली आहे, असे उत्तर वारकेंनी पोलिसांना दिले आहे. त्यावर पुढे तपास सुरू आहे.
सुंदरम फायनान्सचे मॅनेजर निखील गोंडबे यांच्या काळात या कारचा व्यवहार झाला होता. ते सध्या नगरला आहेत. त्यांनाही चौकशीसाठी बोलविले आहे. त्यांच्या माहितीनुसार सुंदरम फायनान्सने 29 सप्टेंबर 15 रोजी कार विकणे आहे, अशी जाहिरात प्रकाशित केली होती. ती कार राजू महाजन यांनी फायनान्सकडून घेतली आहे. महाजन यांची कार नरेंद्र वारके हे वापरत होते. तर या कारला सुरूवातील फायनान्स कंपनीकडून गरूड यांनी अनरजिष्ट्रर घेतली. नंतर गरूड यांच्या चॉईसनुसार पासिंग क्रमांक बुक केला होता, अशी माहिती वारके यांनी दिली आहे. गुंतागुतीचा विषय अभ्यासण्यासाठी गरूड यांना चौकशीसाठी बोलविले आहे. आरटीओ कार्यालयात जाऊन आपण सखोल चौकशी करणार आहोत. संशयास्पद गोष्टी आढळल्यास इतरांदेखील चौकशीसाठी बोलवून तपास करुन तथ्य आढळून आल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल.
सुनिल गायकवाड पो. नि. जिल्हापेठ पो. स्टे