नवी दिल्ली: दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थिनी गुरमेहर कौरला बलात्काराच्या आणि जिवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर विद्यापीठ आणि दिल्लीतील वातावरण भलतेच तापले असून सोशल मीडियावर समर्थक आणि विरोधकांचे युद्धच पेटले आहे. या प्रकरणात भारतीय संघाचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवागने उडी घेतली होती. मात्र आता सेहवागने माघारीची भूमिका घेत आपण फक्त विनोद म्हणून ते ट्विट केले होते. कोणाचीही थट्टा करण्याच्या हेतूने नव्हते असे सांगितले आहे.
धमकी देणारे अत्यंत खालच्या स्तरातील
सेहवागने आपल्या ट्विटवरुन झालेल्या गदारोळानंतर स्पष्टीकरण दिले असून ‘आपण फक्त विनोद म्हणून ते ट्विट केले होते, कोणाचीही थट्टा करण्याच्या हेतूने नव्हते’, असा खुलासा केला आहे. ‘सहमत किंवा असमहत असणे हा मुद्दाच नव्हता. तिला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. तिला बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी देणारे समाजातील अत्यंत खालच्या स्तरातील आहेत. प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे, मग ती गुरमेहर कौर असो अथवा फोगट भगिनी’, असे विरेंद्र सेहवागने ट्विटमधून सांगितले आहे.
गौतम गंभीरचा सेहवागवर अप्रत्यक्ष निशाणा
क्रिकेटपटू गौतम गंभीर यानेही या प्रकरणाता उडी घेत सेहवागने व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. गंभीरने गुरमेहनर कौरला पाठिंबा देत प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे आणि त्याची खिल्ली उडवणे ही लाजीरवाणी गोष्ट असल्याचे म्हटले आहे. गंभीरने आपल्या ट्विटर हॅण्डलवर एका व्हिडिओच्या माध्यमातून आपले मत व्यक्त केले. भारतीय लष्करासाठी माझ्या मनात खूप आदर आहे. देशासाठी जवानांकडून केली जाणाऱया सेवेची तुलना होऊ शकत नाही. पण सध्याच्या काही घटनांमुळे मी खूप निराश झालो. आपण लोकशाही असलेल्या देशात राहत असून प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. जेव्हा एखादी मुलगी आपल्या वडिलांना गमावल्यानंतर देशात शांती कायम राहण्यासाठीची इच्छा व्यक्त करत असेल तर तिला तसे करण्याचा अधिकार आहे. तिच्या मताची खिल्ली उडवणे म्हणजे तिचा अनादर करण्यासमान आहे, असे गंभीरने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.