जळगाव-शहरातील अयोध्यानगरातील नाल्यात चार दिवसांपूर्वी वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह असोदाजवळ आढळून आला आहे. अयोध्यानगर नगर परिसरात असलेला नाला ओलांडून लक्ष्मीनगरात जावे लागते. गुरुवारी १६ रोजी संततधार पावसामुळे नाल्याला पूर आला होता. नाला ओलांडून जात असलेल्या शाळकरी मुलांना मदत करत असताना हेमंत अरुण वाणी यांचा पाय घसरून ते नाल्यात वाहून गेले. प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न करून देखील त्यांचा शोध लागला नव्हता. चार दिवसांनी सोमवार त्यांचा मृतदेह आढळून आला.
आ.सुरेश भोळेंनी केली मदत
सोमवारी सकाळच्या सुमारास असोदा येथे बकऱ्या चारणाऱ्या एकाला नाल्यात मृतदेह आढळून आला. काही ग्रामस्थांनी याबाबत आ.सुरेश भोळे यांना कळविले. आ.भोळे यांनी तात्काळ रुग्णवाहिका पाठवून मृतदेह जिल्हा रुग्णालयात घेऊन येण्यास सांगितले. जगन्नाथ भीमराव साळुंखे, पप्पू जगताप, जितेंद्र राजपूत यांनी याकामी मदत केली.