‘त्या’ तरुणाच्या खुनातील दुसर्‍या संशयिताला मुंबईतून अटक

0

जळगाव। शहरातील शहरातील शनिपेठ भागातील शनिमंदिरासमोरील एका इमारतील पूर्ववैमनस्यातून दोघांनी एका तरूणाचा डोके फरशीने ठेचून निर्घृण खून केल्याची घटना बुधवारी पहाटे घडली होती. या प्रकरणी शनिपेठ पोलिसांनी चोवीस तासात दोन्ही संशयिताना अटक केली आहे. त्यातील एकाला आसोदा रस्त्यावरून तर दुसर्‍याला मुंबई येऊन अटक केली. दोघांना गुरूवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बी.डी.गोरे यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी 23 एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली आहे. दरम्यान, मयत प्रविण माळी याच्या कुटूंबियांनी गुरूवारी सकाळी शनिपेठ पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक आत्माराम प्रधान यांची भेट घेवून त्यांनी आपले व्यथा मांडली. व्यथा मांडत असतांना प्रविण याच्या आईला अश्रू अनावर झाले होते.

फरशीने मारून हत्त्या
शनिपेठेत शनिमंदिराजवळ असलेल्या ओंकार वाणी यांच्या घराच्या तळ मजल्यात मंगळवारी मध्यरात्री पासून प्रवीण उर्फ नितीन सुरेश माळी (वय 28, रा. सत्यम पार्क), भीमा उर्फ पंकज अशोक वाणी (वय 26, रा. विसनजीनगर) आणि राहूल जयराम सपकाळे (वय 23, रा. काचंननगर) हे तिघे दारू पिऊन पत्ते खेळत बसले होते. बुधवारी पहाटे 4 वाजेच्या सुमारास भिमाने प्रवीणचा डोक्यात फरशी मारून खून केला होता. त्यानंतर पंकज आणि राहूल दोघे फरार झाले होते. या प्रकरणी उप विभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे, शनिपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक आत्माराम प्रधान यांनी सहायक पोलिस निरीक्षक सचिन बेंद्रे, विनोद मराठे, विजयसिंग पाटील, जितेंद्र सोनवणे, नरेंद्र ठाकरे, मोतीराम पाटील, प्रफुल्ल धांडे, मिलिंद कंक, दुष्यंत खैरनार, अमित बाविस्कर यांना तपासासाठी पाठविले होते.

कुटूंबियांनी मांडली व्यथा
प्रवीणचा खून झाल्यानंतर त्याचे कुटुंबीय तसेच नातेवाईक गुरूवारी शनिपेठ पोलिस ठाण्यात त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी आले होते. त्यावेळी त्याची आई रेखाबाई माळी, पत्नी पुजा माळी, पाच महिन्याचा चिमुकला प्रेम आणि सतीश माळी, राजेंद्र माळी, गोविंदा माळी, किशोर माळी, पुष्पा माळी, हिराबाई माळी, बेबाबाई माळी, संगिता माळी, आशा माळी, अशोक माळी यांनी प्रधान यांची भेट घेऊन त्यांची व्यथा मांडली. तसेच खून प्रकरणातील संशयीत पंकज आणि राहूल यांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी अशी अपेक्षा यावेळी प्रवीणच्या कुटुंबियांनी प्रधान यांच्या समोर व्यक्त केली. त्यावेळी प्रधान यांनी संशयिताना शिक्षा होण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

होळीच्या दिवशी आला होता जेवायला…
पंकज हा होळीच्या दिवशी प्रवीणच्या घरी जेवणासाठी आला होता. त्यावेळी त्याने प्रवीणची पत्नी पुजा यांना तो म्हटला होता. की वहिनी तुमच्या हातच्या दाळ, चिकोल्या खायच्या आहेत. त्यावेळी पुजा यांनी त्याला दाळ, चिकोल्या करून खाऊ घातल्या होत्या. तसेच त्याच दिवशी सायंकाळीही तो प्रवीणच्या घरी जेवण करून गेल्याचे त्याच्या कुटुंबियांनी सांगितले.

मुंबईतून केली अटक
या प्रकरणातील राहूल सपकाळे याला आसोदा रस्त्यावरून अटक केली. मुख्य संशयीत पंकज हा बुधवारी पहाटे घरी गेला. त्याने त्याच्या आई भुसावळ येथे गेला. त्यानंतर जळगावला न थांबणार्‍या एका एक्स्प्रेस रेल्वेने मुंबईकडे पसार झाला. बुधवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास तो कल्याण येथे रेल्वेतून उतरला. कल्याणला जेवण केले. त्यानंतर तो छत्रपती शिवाजी टर्मिनसला गेला. त्या ठिकाणी जुन्या मित्रांना भेटला. सहज फिरण्यासाठी आल्याचे त्याने सांगितले. आणि त्याच ठिकाणी तो फसला. पोलिसांना तो मुंबईत असल्याची त्याची माहिती मिळाली. पोलिसांचे पथक तत्काळ मुंबईला रवाना झाले. त्याला बुधवारी रात्री 10 वाजेच्या सुमारात सीएसटी रेल्वे स्थानकात ताब्यात घेतले. दोघांना गुरूवारी न्यायाधीश बी.डी.गोरे यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी 23 एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली आहे. सरकारतर्फे अ‍ॅड. स्वाती निकम यांनी तर संशयितातर्फे अ‍ॅड.एस.सी. पावसे यांनी कामकाज पाहिले.