जळगाव। बेंडाळे चौकात गुरूवारी रात्री दोन मोटारसायकलस्वार तरुणांनी एका पादचार्याला बांबूने बेदम मारहाण केली होती. त्यात पादचार्याचा मृत्यू झाला होता. अखेर या प्रकरणी शनिवारी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात दोघांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दुसर्या संशयीताला एमआयडीसी पोलिसांनी सायंकाळी अटक केली. तसेच मृताचे पीएम रिपोटस् देखील आले असून त्यात मारहाण झाल्याने डोक्यात अतिरक्तस्त्राव होवून तसेच पोटात मार बसल्याने मृत्यू झाल्याचेही निष्पन्न झाले आहे. यातच पोलिसांना दोन्ही संशयितांना अटक करण्यात यश आले आहे.
तुकाराम वाडीतील संदीप दत्तात्रेय वाणी (बोरसे, वय 22) आणि भूषण माळी (वय 18) हे दोघे गुरूवारी रात्री हळदीच्या कार्यक्रमातून परत जात असताना बेंडाळे चौकात एका पादचार्याला त्यांच्या दुचाकीचा कट लागला. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. दोघांनी त्यात तरूणाला बेदम मारहाण केली. त्यानंतर तो जीव वाचविण्यासाठी पळत सुटला. मात्र दोघांनी त्याला बांबूने मारहाण केली. त्यात जखमी अवस्थेत तो शुक्रवार सकाळपर्यंत जिल्हा सामान्य रुग्णालयाजवळ असलेल्या वाचनालयाच्या भिंतीजवळ पडून होता. त्यानंतर नागरीकांनी माहिती दिल्यावर पोलिसांनी त्याला सिव्हीलमध्ये दाखल केले. मात्र आपतकालीन वैद्यकीय अधिकार्यांनी त्याला मृत घोषीत केले.
एमआयडीसी पोलिसांनी केली अटक
अज्ञात तरूणाला मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. त्यावरून उप विभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे यांनी दिलेल्या सूचनेवरून पोलिस निरीक्षक सुनील कुराडे यांनी पीएसआय रोहन खंडागळे, रामकृष्ण पाटील, मनोज सुरवाडे, विजय पाटील, नितीन बाविस्कर यांच्या पथकाला संशयिताना शोधण्यासाठी पाठविले. त्यापैकी संदीप वाणी याला लग्नातून अटक केली. त्यावेळी भूषण फरार होण्यात
यशस्वी झाला.
संशयित मध्यप्रदेशात फरार
खून प्रकरणातील दुसरा संशयीत भूषण माळी हा रेल्वेने मध्य प्रदेशात पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार एमआयडीसी पोलिसांनी पथके तयार केली. मात्र तो शनिवारी भुसावळ मार्गे रस्त्याने परत येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या पथकाने अजिंठा चौफुलीवर सापळा लावला. तो बसने अजिंठा चौफुलीवर उतरल्यानंतर त्याला लगेच ताब्यात घेतले.
मारहाण केल्याची कबुली…
संशयीत संदीप वाणी याची पोलिसांनी चौकशी केली असता त्याने दुचाकीला कट लागल्याचा वादातून तरूणाला बांबूने तसेच लाथा, बुक्क्यांनी मारहाण केल्याची कबुली दिली आहे. त्यावरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दोघांच्या विरोधात शनिवारी रात्री खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
अतिरक्तश्रावाने मृत्यू…
डोक्यावर मारहाण केल्याने मेंदूत अतिरक्तश्राव झाल्याने तसेच पोटात बेदम मारहाण केल्याने तरूणाचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक शवविच्छेदन अहवालात निष्पन्न झाले आहे. तसेच त्याचा व्हिसेरा पुढील तपासासाठी धुळे येथे तर त्याचे रक्त केमिकल अॅनालीसससाठी नाशिक येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याची माहिती अतिरीक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी दिली.
दोन्ही संशयितांना अटक…
तरूणाच्या मृत्यू प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात दोन संशयिताना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. असे डिवायएसपी सचिन सांगळे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.