जळगाव। जिल्हा बँकेच्या चोपडा शाखेत नोटाबंदीच्या काळात चलनातील बंद झालेल्या नोटा बदलुन दिल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. नोटाबदलीप्रकरणी जिल्हा बँकेच्या चौकसीनंतर सीबीआय धागेदोरे जिल्हा परिषदेपर्यत पोहोचले आता हे धागेदोर थेट सुभाष चौक अर्बन क्रेडीट को-ऑप सोसायटीपर्यंत पोहचले असल्याचे सीबीआयच्या चौकशीवरुन दिसून आले आहे. नोटाबदलीप्रकरण अजुनही सीबीआय चौकशी सत्र सुरुच आहे. या प्रकरणात पुढील चौकशीसाठी जिल्हा परिषद उपमुख्यकार्यकारी अधिकारी नंदकुमार वाणी, वाणी यांचे बांधकाम व्यावसाय भागीदार ओम जांगीड व सुभाष चौक अर्बन सोसायटीचे व्यवस्थापक अनिल नारखेडे यांना बुधवारी 29 रोजी मुंबई येथे चौकशीसाठी प्राचारण करण्यात आल्याचे वृत्त होते. चौकशीकरीता तिघही मंगळवारी 28 रोजी मुंबईला रवाना झाल्याचे समजले. त्यांची चौकशी करण्यात आली असली तरी मात्र मुंबईच्या सीबीआय सूत्राने याबाबत दुजोरा दिला नाही. दरम्यान जिल्हा बँकेच्या नोट बदलीप्रकरणी सीबीआयकडून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात आतापर्यंत 10 जणांची चौकशी करण्यात आली आहे.
इतरांनाही बोलावणार
सीबीआयाने चौकशीसाठी मुंबई येथे जिल्हा परिषद उपमुख्यकार्यकारी अधिकारी नंदकुमार वाणी, बांधकाम व्यावसायी ओम जांगीड, सुभाष चौक अर्बन सोसायटीचे व्यवस्थापक अनिल नारखेडे यांना बोलविल्याचे वृत्त होते. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तिघांचेही भ्रमणध्वनी नॉट रिचेबल दाखवित होते. त्यामुळे चौकशीची अधिकृत माहिती मिळू शकली नाही. सीबीआय पथकाने केलेल्या चौकशीचे धागेदोर लांबतच चालले आहे. आणखी जिल्हा बँकेच्या चोपडा शाखेचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर पाटील व रोखपाल रवींद्र गुजराथी यांना देखील सीबीआयच्या पथकाकडून चौकशीसाठी लवकरच बोलविण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.