भुसावळ– भुसावळातील स्वस्त धान्य वाटपातील भ्रष्टाचार जिल्हा परीषद सदस्या पल्लवी सावकारे यांच्या तक्रारीनंतर उघड झाल्याने भ्रष्टाचारात सहभागी असलेल्यांच्या गोटात मोठीच खळबळ उडाली आहे. वरणगाव येथे पाठवण्यात येणार्या स्वस्त धान्यात क्विंटलमागे तब्बल 10 ते 12 किलो धान्य कमी पाठवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी उघड केल्यानंतर थेट ही बाब राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री गिरीश बापटांच्या कानावर घातल्यानंतर संपूर्ण जिल्ह्याभरात शासकीय गोदामांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. वरणगावच्या अपंग स्वस्त धान्य दुकानदाराला पाठवण्यात येणारा धान्याचा साठा तहसील प्रशासनाने सील केला आहे तर शासनाचे आदेश आल्यानंतर या साठ्याची तपासणी करू, असे चौकशी अधिकारी तथा मुंबईतील पुरवठा आयुक्त कार्यालयातील सहाय्यक संचालक पद्माकर गांगवे म्हणाले. 48 तासांपासून आम्ही धान्याचे प्रमाणिकरण करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
तपासणीमुळे वितरण बंद
मुंबईहून आलेल्या विशेष पथकाकडून शासकीय गोदामातील संपूर्ण धान्याचे प्रमाणिकरण केले जात आहे त्यामुळे शनिवारी धान्याचे वाटप झाले नाही तर रविवार शासकीय सुटी असल्याने धान्याचे वितरण झाले नाही परीणाम शहर व तालुक्यात लाभार्थी धान्यापासून वंचित राहिले.
तहसीलदार तळ ठोकून
जळगाव जिल्ह्यात तब्बल शंभर कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत माजी मंत्री खडसे यांनी प्रांत, तहसीलदारांवरच हप्तेखोरीचे उघड आरोप केल्यानंतर अधिकारी हादरले आहे. मुंबईच्या पथकासोबत तहसीलदार विशाल नाईकवडे, गोडावून कीपर जगताप गोदामावर तळ ठोकून आहेत. दोषींवर काय कारवाई होते ? याकडे भुसावळ शहर व तालुक्याचे लक्ष लागले आहे.
रॅकेटचा व्हावा पर्दाफाश
भुसावळात स्वस्त धान्याचा काळाबाजार करणारी टोळी सक्रिय आहे. शासकीय गोदामात क्विंटलमागे दहा ते 12 किलो धान्य कमी दिले जात असल्याने यात अनेकांचा सहभाग दिसून येतो. दोषी असलेल्यांवर फौजदारी गुन्हे दाखल केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे जिल्हा परीषद सदस्या पल्लवी सावकारे म्हणाल्या. मुंबईहून आलेल्या पथकाने पारदर्शकपणे चौकशी करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.