”त्या” निष्पाप बाळाचा बापानेच घेतला बळी ?

0

पिंपरी चिंचवड :– एखादा बाप रागात आपल्या मुलावर हात उचलताना देखील थरथरतो , मात्र रागाच्या भरात कुणी आपल्या आठ महिन्याच्या बाळाचा गळा आवळून हत्या करेल का ? पिंपरी चिंचवडमधील हिंजवडी येथे झालेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. प्रेमप्रकरणासाठी पत्नी आणि मुलाची सुपारी देऊन हत्या केलेल्या पतीनेच आपल्या ८ महिन्याच्या चिमुकल्याची हत्या केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणातील आरोपींनी आम्ही फक्त पत्नीला मारण्याची सुपारी घेतल्याचे पोलीस तपासात म्हटले आहे. त्यामुळे निष्पाप बाळाचा जीव क्रूर पित्यानेच घेतला असावा असा अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.

9 जून रोजी मध्यरात्री साडे दहाच्या सुमारास अश्विनी भोंडवे व अनुज भोंडवे या मायलेकरांचा गळा दाबून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी पती दत्ता भोंडवेने सुरुवातीला लुटमारीचा बनाव रचला होता. मात्र या प्रकरणात पोलिसांनी चौकशीत दत्ता व त्याच्या प्रेयसीने पत्नी व बाळाची हत्या करण्यासाठी तिघांना दोन लाखांची सुपारी दिल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी तपास करीत या हत्येप्रकरणी अश्विनीचा पती दत्ता वसंत भोंडवे, त्याची प्रेयसी सोनाली बाळासाहेब जावळे, प्रशांत जगन भोर, पवन नारायण जाधव आणि सावन नारायण जाधव यांना अटक करण्यात आली होती.

पोलिसांनी सुपारी घेतलेल्या आरोपींकडे चौकशी करताना ही सुपारी फक्त पत्नीची हत्या करण्यासाठी घेतल्याची कबुली दिली आहे. आम्ही त्या बाळाला मारले नसल्याचे आरोपींकडून सांगण्यात आले. दत्ताने कार नेरे जांबे रस्त्यावरील निर्मनुष्य ठिकाणी आणल्यानंतर आरोपींनी दोरीने गळा आवळून अश्‍विनीचा खून केला. त्यानंतर अश्विनी मृत पावल्याची खात्री झाल्यानंतर दत्ता पुन्हा आरोपींना सोडण्यासाठी पुनावळे येथे आला होता. त्यावेळी अनुज जिवंत होता. आम्हाला पुनावळेत सोडल्यानंतर दत्ता पुन्हा त्याच ठिकाणी जाऊन चिमुकल्या अनुजचा गळा दाबला असल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला. त्यामुळे या घटनेला आणखी नवे वळण मिळण्याची शक्यता असून बापानेच चिमुरड्याचा गळा घोटल्याची शक्यता आहे. दरम्यान, या संदर्भात पोलिसांनी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. हिंजवडी पोलीस या प्रकरणी सखोल तपास करीत आहे.