मुंबई । सांताक्रूझ पूर्वच्या डवरी नगर, हनुमान टेकडी, मराठा कॉलनी, पटेल नगर, हुसेन टेकडी, इंदिरा नगर आदी वसाहतींच्या रहिवाशांमध्ये आता प्रचंड घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. संरक्षण दलाच्या जागेवर असलेल्या या घरांना सदर भूखंड रिक्त करण्यासाठी एअरफोर्स स्टेशन, मुंबई यांच्यातर्फे नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत. सांताक्रूझ पूर्व येथील संरक्षण खात्याच्या जमिनीवरील रहिवाशांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देऊन निवडणूक जिंकलेल्या लोकप्रतिनिधी सत्ताधार्यांनी आता तिथे अनेक वर्षे राहत असलेल्या तिथल्या रहिवाशांना जागा खाली करण्याच्या नोटीस संरक्षण खात्याकडून द्यायला भाग पाडले असल्याचा आरोप मनसेने केला आहे. त्यामुळे निवडणूक आश्वासनाप्रमाणे आता त्या त्यांची बाजू घेऊन त्याला स्थगिती देतील व येणार्या निवडणुकीत मतदारांना आकर्षित करतील, या रहिवाशांच्या जीवावर त्यांनी राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केल्यास व रहिवाशांना जाणीवपूर्वक त्रास दिल्यास त्यांच्याविरुद्ध तीव्र आंदोलन करून त्यांचाच डाव त्यांच्यावर उलटविण्याचा निर्धार मनसेचे रुपेश मालुसरे यांनी दिला आहे.
खालच्या पातळीवरील राजकारण
येणार्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन, सध्या केंद्रात आणि राज्यात सरकार असलेल्या लोकप्रतिनिधींनी अशाप्रकारच्या नोटीस बजावून या भूखंडावर राहणार्या झोपडपट्टीवासीयांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण करणे व नंतर त्यांची दिशाभूल करून या नोटीस रद्द करून येथील जनतेची सहानुभूती मिळवणे, अशा केविलवाण्या प्रकारच्या खालच्या पातळीचे राजकारण सध्या प्रभागात सुरू आहे. सरकारच्या या खालच्या पातळीवरील राजकारणाचा मनसेकडून जाहीर निषेध केला जात आहे. पण या प्रकाराविरुद्ध आता उग्र जनआंदोलन करण्याचाही निर्णय मनसेने घेतला आहे. त्यामुळे प्रभागातील जनतेनेही सध्या या हीन दर्जाच्या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष द्यावे व या आंदोलनात सहभागी व्हावे. सत्ताधारी लोकप्रतिनिधींचा डाव त्यांच्यावरच उलटवावा, असे आवाहनही मनसेने केले आहे.
विकासाचा देखावा केला जातोय
डवरी नगर, हनुमान टेकडी, मराठा कॉलनी, पटेल नगर, हुसेन टेकडी, इंदिरा नगर आदी वसाहतींच्या रहिवाशांमध्ये आता प्रचंड घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. संरक्षण दलाच्या जागेवर असलेल्या या घरांना सदर भूखंड रिक्त करण्यासाठी एअरफोर्स स्टेशन, मुंबई यांच्यातर्फे नोटीसा बजावण्यात आलेल्या आहेत. वास्तविक या रहिवाशांना याच ठिकाणी कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचे आश्वासन लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेल्या सत्ताधार्यांनी निवडणूक जिंकण्यासाठी दिले होते. असे असतानाही त्यांनी गेल्या चार वर्षांत कुठलीही कार्यवाही केली नाही व त्यांचे कुठलेही समाधानकारक कार्य इथे नाही. त्यामुळे त्यांच्यात कमालीची नाराजी आहे. ही बाब ध्यानात घेऊनच आता इथल्या मतदारांची तळी उचलण्याची व त्यांचे कल्याण करण्याचा देखावा निर्माण करण्याची क्लुप्ती त्यांनी आखली आहे, असे रुपेश मालुसरे यांचे म्हणणे आहे.