थेरोळा गावाजवळील पूर्णा पात्रात आढळला होता मृतदेह : आज होणार अंत्यसंस्कार
मुक्ताईनगर – तालुक्यातील थेरोळा गावालगतच्या पूर्णा नदी पात्रात पट्टेदार वाघ रविवारी पहाटे मृतावस्थेत आढळून आल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. गेल्या पाच महिन्यातील वाघाचा मृत्यू होण्याची दुसरी घटना आहे. दरम्यान, वाघाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? याबाबत ठोस कारण सांगण्यास वनविभागाने असमर्थता दर्शवली तर सोमवारी शवविच्छेदनानंतर नेमके ठोस कारणू कळणार आहे. विशेष म्हणजे पाण्यात पडल्याने वाघाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला असून वाघाच्या शरीराभोवती नायलॉन दोरी गुंडाळण्यात आल्याने वाघाचा दुसरीकडे कुठे अन्यत्र मृत्यू होवून भीतीपोटी त्याचे शव नदीकाठी तर टाकण्यात आले नाही ना? असाप्रश्नदेखील उपस्थित होत आहे. सोमवार, 13 रोजी चारठाणा येथील वनविभागाच्या कार्यालयात वैद्यकीय पथकाकडून वाघाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार असून त्यानंतर ठोस मृत्यूचे कारण कळणार आहे.
वाघाच्या मृतदेहाचे आज शवविच्छेदन : अधिकार्यांची धाव
तापी पात्रात वाघाचा मृतदेह असल्याची माहिती कळताच जळगावचे उपवन संरक्षक डिगंबर पगार, मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे, जळगावचे सहाय्यक वनसंरक्षक संजय मोरे, वढोदा वनक्षेत्रपाल अमोल चव्हाण, जळगावचे गस्ती पथकाचे वनक्षेत्रपाल धनंजय पवार, पाचोरा वनक्षेत्रपाल ज्ञानेश्वर देसाई, जामनेर वनक्षेत्रपाल समाधान पाटील यांच्यासह पशुवैद्यकीय अधिकार्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. सायंकाळी उशीर झाल्याने वाघाचा मृतदेह चारठाणा वनविभागाच्या कार्यालयात हलवण्यात आला असून सोमवारी सकाळी शवविच्छेदन केले जाणार आहे. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होवू शकणार आहे.
शिकारीची शक्यता कमीच -वनविभाग
12 ते 15 वर्ष आयुर्मान असलेल्या व कुजलेल्या अवस्थेतील वाघाचा मृतदेह आढळला असून त्याची शिकार झाली असावी, अशी शक्यता कमीच असल्याचे सूत्रांनी सांगितले. वाघाचे पंजे तसेच दात शाबूत असल्याने शिकार झाली नसावी मात्र शवविच्छेदनानंतर अधिक काही सांगता येईल, असे वनविभागाच्या सूत्रांनी सांगितले.
वन्य प्राण्यांवर मॉनिटरींगचा अभाव
मुक्ताईनगर तालुक्यातील वढोदा वनपरीक्षेत्रात डोलारखेडा शिवारात आतापर्यंत अनेकदा वाघाचे दर्शन झाले असून अन्य पाळीव प्राण्यांवर हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या परीसरात वाघाचा अधिवास मोठ्या प्रमाणावर असताना वनविभागाने ट्रॅप कॅमेरे लावण्याशिवाय या भागात ठोस अशा उपाययोजनाच केल्या नाहीत. वढोदा संवर्धन राखीव परीक्षेत्र वाघांचे प्रजनन क्षेत्र असतानाही या भागात अभ्यासू अधिकार्यांची नितांत आवश्यकता आहे मात्र या प्रकाराकडे एकूणच वनविभागाने डोळेझाक केल्याचे दिसून येते.
पाच महिन्यातील दुसरी घटना
डोलारखेडा शिवारातील सुकळी शिवारात 16 वर्षीय वयोमान असलेल्या वाघिणीचा शुक्रवार, 23 मार्च 2018 रोजी मृतदेह आढळला होता. सुकळी शिवारातील जयराम पाटील हे शेतकरी शेतात गेल्यानंतर त्यांना वाघीण बसलेली आढळली. सुरुवातीला त्यांना वाघीण शेतात बसल्याचे जाणवल्याने त्यांनी तातडीने वनविभागाला माहिती दिली तर वनविभागाच्या अधिकार्यांनी तेथे पोहोचल्यानंतर परिस्थितीचा अंदाज घेत सावधपणे वाघिणीला सखोल निरीक्षण पध्दतीने पाहिल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याचे जाणवले होते. सुमारे तीन वर्षांपूर्वी देखील एका वाघिणीचा याच परीसरात अपघाती मृत्यू झाला होता हेदेखील विशेष!
वाघाच्या मृत्यूनंतर नदीपात्रात फेकल्याचा संशय
वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी अनेक शेतकरी शेताला तारेच कुंपण घालतात शिवाय अनेकदा वीज प्रवाहही त्यात सोडला जातो त्यामुळे असा प्रकार होवून वाघ मेल्यानंतर प्रकरण अंगलट यायला नको म्हणून त्याचा मृतदेह नदीपात्रात तर फेकण्यात आला नाही ना? अशीदेखील शंका आहे. विशेष म्हणजे पाच ते सात दिवसांपासून वाघाचे शव नदीपात्रात असताना कुणीही नागरीकाने पुढे येवून वनविभागाला माहिती न दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.