‘त्या’ पाच जणांना स्थानबद्धच ठेवा-सर्वोच्च न्यायालय

0

नवी दिल्ली-नक्षलवादी संघटनेशी संबंध असल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी कारवाई करत ५ जणांना अटक केली होती. त्यात कवी वरवरा राव, अॅड. सुधा भारद्वाज, अॅड. अरुण परेरा, वर्नन गोन्साल्विस आणि गौतम नवलाखा या पाच जणांचा समावेश आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी झाली त्यात या ५ जणांना १२ सप्टेंबरपर्यंत स्थानबद्धच ठेवावे, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. ए एम खानविलकर आणि न्या. डी वाय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने अतिरिक्त पोलीस महासंचालक परमवीर सिंह यांच्या पत्रकार परिषदेवरुन खडे बोल सुनावले. आम्ही या सर्व घटनेची गंभीर दखल घेतली आहे, असे कोर्टाने सांगितले. मात्र, पोलिसांनी कोणतीही माहिती उघड नये करु, अशी याचिकाकर्त्यांची मागणी कोर्टाने फेटाळून लावली.

तर महाराष्ट्र सरकारच्यावतीने सांगण्यात आले की, याचिकाकर्त्यांचा या प्रकरणाशी थेट संबंध नाही. पोलिसांनी जप्त केलेल्या कागदपत्रांवरुन आरोपींच्या कटाचे गांभीर्य लक्ष येते. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने पाचही आरोपींना १२ सप्टेंबरपर्यंत स्थानबद्ध ठेवण्याचे आदेश दिले.

दरम्यान, बुधवारी झालेल्या सुनावणीत पाचही आरोपींना स्थानबद्ध करण्याऐवजी पोलीस कोठडी द्यावी, अशी विनंती पोलिसांच्यावतीने करण्यात आली होती. मात्र, कोर्टाने पाचही आरोपींना स्थानबद्ध ठेवण्याचे आदेश दिल्याने पोलिसांना हादरा बसला आहे.