मुंबई । क्रिकेट वर्तुळात सध्या एका व्हीडिओची बरीच चर्चा सुरू आहे. तो व्हीडिओ म्हणजे एका फलंदाजाच्या बॅटला चेंडू न लागताच यष्टीरक्षकाकडे गेला असतानाही त्या फलंदाजाला पंचांनी बाद दिले. या खेळाडूला नेमके कशासाठी बाद दिले याविषयी शक्याशक्यता व्यक्त केल्या गेल्या. त्या सामन्याचा स्कोअरबोर्ड, त्यातील खेळाडूंची नावे, पंचांनी हा निर्णय देण्यामागील विविध कारणे दिली जाऊ लागली आणि हा व्हीडिओ चांगलाच गाजला. दस्तुरखुद्द युवराजसिंगनेही हा व्हीडिओ शेअर केला होता.
सदर सामना हा 2007साली सरे आणि लीडस या कौंटी संघांमध्ये झालेला सामना आहे. त्यात फलंदाजी करणारा खेळाडू हा लीडसचा टॉम मेरीलाट असून त्याला गोलंदाजी करणारा गोलंदाज हा सरेचा मोहम्मद अक्रम आहे. यष्टीरक्षक जॉन बॅटीने तो झेल पकडला आहे. तर पंच आहेत आंतरराष्ट्रीय पंच इयन गौल्ड. त्याविषयी एक माहिती सोशल मीडियावर पुढे आली ती ही की, मेरीलाट हा आधीच्या षटकात हीट विकेट झाला होता आणि त्याचवेळी पंचांनी षटक पूर्ण झाल्याची घोषणा केली. त्यामुळे दोन्ही संघांत गोंधळ झाला आणि शेवटी दोघांमध्ये झालेल्या चर्चेअंती पुढच्या षटकात गोलंदाजाने चेंडू टाकायचा आणि पंचांनी त्याला बाद द्यायचे.