‘त्या’ बालिकेचा शोध थांबविला?

0

अपहरणाचा बनाव केलेल्या आईचीयेरवडा कारागृहात रवानगी

खडकी । मुलगी झाल्याच्या नैराश्यातून जन्मदात्या आईनेच दहा दिवसांच्या मुलीस नदीत फेकून देऊन अपहरणाचा खोटा बनाव केल्याच्या घटनेला एक आठवड्याचा कालावधी उलटून गेला तरी खडकी पोलिस व अग्निशामक दलास मुलीचा शोध घेण्यात अद्याप यश आले नाही.क्रूरकर्मी आईला दोन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर तिची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली असल्याची माहिती खडकी पोलिसांनी दिली.

रेश्मा रियासत शेख (20,रा.बॉम्बे कॉलनी, दापोडी) या महिलेवर खडकी पोलिसांनी खून व खुनाचा पुरावा नष्ट करण्याप्रकरणी गुन्हा दाखल करून तिला 16 ऑगस्टला अटक केली. दोन दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर शेखची रवानगी करण्यात आली.

रिक्षाचालक व सहप्रवासी महिलेने आपले दहा दिवसांची मुलगी धक्का देऊन पळवून नेल्याची तक्रार शेखने खडकी पोलिसांकडे दि. 16ला सकाळी 11 वाजता दिली. तिच्या जबानीत विसंगती आढळून आल्याने पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून हा बनाव उघड केला. पोलिसांनी खाक्या दाखवल्यानंतर बाळास प्लॅस्टिकच्या काळ्या बॅगेत घालून त्यास बोपोडी येथील वि.भा. पाटील पुला खालील मुळा नदीपात्रात फेकून दिले असल्याचे अखेर कबूल केले. पोलिसांनी आग्निशामक दलाच्या मदतीने दि 17 रोजी दिवसभर मुळा नदीपात्रात शोध घेतला मात्र बाळाचा मृतदेह सापडला नाही. पावसामुळे नदीतील पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे फेकलेले बाळ पुढे गेले असावे, असा संशय पोलिस व अग्निशामक दलाने व्यक्त करीत दुसर्‍या दिवसापासून शोध मोहीम थांबवली. या घटनेस एक आठवड्याचा कालावधी उलटून गेला तरी अद्याप या बाळाचा शोध लागला नाही. वरिष्ठ पोलिस निरीक्षक लक्ष्मण बोराटे म्हणाले, याप्रकरणी पोलिस व अग्निशामक दलाने बाळाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र बाळ सापडले नाही. त्यामुळे शोध थांबवण्यात आला आहे.