’त्या’ बिबट्यावर शासकिय इतमामात अंत्यसंस्कार

0

शवविच्छेदन व परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे विषबाधेमुळे मृत झाल्याचा अंदाज
मेंढीवर विषप्रयोग केल्याचे स्पष्ट; एका संशयितास घेतले ताब्यात

भुसावळ – वरणगाव येथील माजी सैनिक अनिल पाटील यांच्या शिवारातील केळी बागेत अंदाजे चार वर्षे वयाच्या ठिपकेदार बिबट्याचा रविवारी 3 रोजी सकाळी मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. मयत झालेल्या बिबट्यावर शवविच्छेदन करण्यात आले असून शासकिय इतमामात मुक्ताईनगर वनविभागाच्या नर्सरीत अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, मृत मेंढीचे केस, डोक्याचा भाग, जठराचा भाग, एका पिशवीत जवळच्या एका कोरड्या विहिरीत आढळून आले. मृत बिबट्याने मेंढीच्या खाल्लेल्या मांसाची उलटी व विष्ठा जवळच आढळून आली. मेंढीच्या अवशेषांच्या आसपास विषारी द्रव्याचा वास येत असल्याचे आढळून आले. या मेंढीवर विषप्रयोग केल्याचे स्पष्ट होते. त्यानुसार मृत बिबट्यापासून जवळच बसलेल्या एका मेंढपार ज्ञानेश्‍वर जगन धनगर या संशयित आरोपी म्हणून त्यास चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले.

मृत मेंढीचे सापडले अवशेष
रविवारी सकाळी शेळ्या-मेंढ्या चारणार्यांना केळी बागेत मृत बिबट्या आढळल्याने त्यांनी शेतकर्यांना माहिती दिली. यानंतर वनविभागाला कळवण्यात आले. या घटनेची माहिती कळताच वनविभागाचे वनपाल बोरसे, दीपाली जाधव यांच्यासह वनविभागाच्या अधिकारी व कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या परिसराची शोधमोहिम वनकर्मचारी यांनी सुरु केली असता मृत बिबट्याच्या 100 किमी परिघात एक मृत मेंढीचे अवशेष आढळले.

अंत्यसंस्कारास अधिकार्‍यांची उपस्थिती
मानद वन्यजीव रक्षक तथा एनआयसीए सदस्य राजेश ठोंबरे, सहाय्यक वनसरंक्षक राजेश दसरे, वनक्षेत्रपाल आशुतोष बच्छाव मुक्ताईनगर, वनक्षेत्रपाल धनंजय पवार, पशुवैद्यकीय अधिकारी पी.एम.पिचड, पशुवैद्यकीय अधिकारी वरणगाव डॉ.एस.बी.तडवी, पशुवैद्यकीय अधिकारी भुसावळ डॉ.हेमंत वाघोदे, पशुवैद्यकीय अधिकारी किन्ही पी.ई.चौधरी, पशुधन पर्यवेक्षक वरणगाव ई.जी.कापसे, व्रर्णोपचार वरणगाव तसेच मौजे मन्यारखेडे येथील पोलिस पाटील दीपक चौथे यांच्यासमवेत बिबट्याचे शवविच्छेदन घटनास्थळीच करण्यात आले व शासकीय इतमामात अंत्यविधी करण्यात आले.

विसेरा पाठविला प्रयोगशाळेत
प्रथमदर्शनी शवविच्छेदन व परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे बिबट्या हा विषबाधेमुळे मृत झाला असावा असा अंदाज आहे व त्याकामी मृत बिबट्याचा विसेरा हा न्याय वैद्यकीय प्रयोगशाळा येथे सिलबंद करुन पाठविण्यात आला असून त्याचा अहवाल प्राप्त झाल्यावर नेमके कारण स्पष्ट होईल. तपासकामी धनंजय पवार तसेच रेंज स्टॉफ वडोदा व मुक्ताईनगर रेंज स्टाफ यांनी मदत केली. तसेच तपासकामात स्थानिक गावकरी यांनी सहकार्य केले. तपासकामी उपवनसंरक्षक श्री.पगार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक श्री.दसरे, आशुतोष बच्छाव व स्थानिक वनकर्मचारी तपास करीत आहेत.