शिरपूर: देवाधर्माच्या नावावर अनेक भोळ्याभाबड्या भाविकांना फसविण्यात आल्याचे अनेक प्रकार समोर येत असतात. त्यात शिरपूर तालुक्यातही जनतेच्या धार्मिक भावनेशी खेळून लोकांची फसवणूक करणार्या व चार वर्षांपासून आर्थिक हिशोब न दाखविणारा भोंदू महाराज विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भारतीय कम्युनिष्ठ पक्षातर्फे करण्यात आली.
तालुक्यातील हिसाळे येथे गोरक्षनाथ मंदिर आहे. मंदिराच्या देखभालीसाठी ट्रस्ट स्थापन करण्यात आले आहे. देवपूजेसाठी संगमनाथ महाराज यांची नियुक्ती केली आहे. मंदिरात 21 जून रोजी मंदिराची देखभाल आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत गोरक्षनाथ ट्रस्टचे ट्रस्टी, गावातील पदाधिकारी, कॉ.अँड.हिरालाल परदेशी, काँ.अर्जन कोळी आदी उपस्थित होते. यावेळी फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला. मंदिरात देवपूजा करणारे संगमनाथ महाराज यांनी चार वर्षांपासून 20 पावती पुस्तकाचा हिशोबच दिलेला नाही. तसेच संगमनाथ कुठेही दिसत नसल्याने गायब झाले आहेत. म्हणून तोंदे येथील महादु महाराज पुजारीचे काम करतील, असे सर्वानुमते ठरविण्यात आले.
परंतु यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने वेगळी भूमिका घेत ज्या संगमनाथ नावाच्या व्यक्तीने साधुचा वेशधारण करून जनतेच्या धार्मिक भावनेशी चार वर्ष फसवणूक करत राहिला, तरीही त्याचा ऊदो, ऊदो केला. या संगमनाथ भोंदूबाबाने एवढे पराक्रम करूनही ट्रस्टींनी भोंदूबाबाविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिलेला नाही. म्हणजेच सर्वच गोष्टींना ट्रस्टी तसेच त्याला पाठीशी घालणारे जबाबदार आहेत. ट्रस्टी भोंदू बाबाला पाठीशी घालत आहेत. भोंदूबाबा संगमनाथवर ट्रस्टने थाळनेर पोलीस ठाण्यात त्वरित गुन्हा दाखल करावा. अन्यथा, भोंदू बाबा व ट्रस्टींवर भाकपतर्फे गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच जनतेने अशा भोंदू बाबापासुन सावध रहावे, असे आवाहन भाकपने केले आहे.