‘त्या’ महासभेची आ. भोळेंकडून प्रोसिडींग मागणी

0

जळगाव। महानगरपालिकेच्या बुधवार 9 ऑगस्ट रोजी झालेल्या विशेष महासभेत खाविआचे रमेश जैन यांनी 25 कोटी निधीसंदर्भांत …तर शहरात आमदार खासदार निधीतील कामांना मंजूरी देणार नाही असा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर आमदार सुरेश भोळे यांनी त्या महासभेच्या प्रोसिडींगची माहीती मागविली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव महानगरपालिकेस विकासकामांसाठी 25 कोटींचा निधी दिला आहे. या निधीतील कामे ही बांधकाम विभागाकडून करावी अशी मागणी आमदार सुरेश भोळे यांनी केली होती. त्यानुसार महानगरपालिकेला दिलेला निधी जिल्हा प्रशासनाकडे पुन्हा वर्ग करुन घेतला होता. ही बांधकाम विभागाकडून होणार होती.

खाविआ नेते करीत होते विरोध
महानगरपालिकेच्या बुधवारी झालेल्या विशेष महासभेत सत्ताधारी खान्देश विकास आघाडीचे सभागृह नेते रमेश जैन यांनी मुख्यमंत्री यांनी जळगाव महापालिकेस विकासासाठी दिलेल्या 25 कोटी रुपयांच्या निधीतील कामे बांधकाम विभागाकडून नव्हे तर महानगरपालिकेकडून करावी असे सूचविले होते. जर ही कामे बांधकाम विभागाकडून केली तर मग यापुढे आमदार खासदार निधीतील कामांना महानगरपालिका मंजूरी देणार नाही असा इशारा त्यांनी यावेळी दिला होता. रमेश जैन यांच्या वक्तव्यांचा भाजपा नगरसेवकांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून निषेध व्यक्त केला आहे. तसेच विधानसभेत आमदार सुरेश भोळे यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. आज शुक्रवार 11 ऑगस्ट रोजी आमदार सुरेश भोळे यांच्याकडून महानगरपालिकेच्या नगरसचिव विभागातून या महासभेच्या प्रोसेडींगची माहीती मागविण्यात आली असून तसा अर्ज देखिल करण्यात आला आहे.