‘त्या’ महिला सफाई कर्मचारी महिलेला महापौरांची मदत

0

घरी जाऊन घेतली भेट : वॉटरग्रेसचे सहकार्य

जळगाव: शहरातील साफसफाईचा मक्ता दिलेल्या वॉटरग्रेस कंपनीची कंत्राटी सफाई कर्मचारी महिला साफसफाई करताना काचेची बाटली फुटल्याने जखमी झाल्या होत्या. शहरात साफसफाई करताना एका कचर्‍याला लागलेल्या आगीत असलेली बाटली फुटल्याने वॉटरग्रेसच्या महिला सफाई कर्मचारी सिंधुबाई भाऊलाल सपकाळे या जखमी झाल्या होत्या. माध्यमातून याबाबत वृत्त प्रकाशित झाल्यानंतर महापौर सौ.भारती सोनवणे यांनी तात्काळ मक्तेदार वॉटरग्रेसच्या अधिकार्‍यांशी चर्चा करून महिलेला मदत देण्याचे सांगितले.

महापौरांनी केली विचारपूस
शनिवारी दुपारी महापौर सौ.भारती सोनवणे यांनी समता नगरात घरी जाऊन सिंधुबाई यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच महापौरांनी स्वतः आणि वॉटरग्रेस कंपनीमार्फत सिंधुबाई यांना आर्थिक मदत केली. यावेळी वॉटरग्रेसचे प्रतिनिधी नितीन पर्वते, मनपाचे उज्ज्वल बेंडवाल, कुणाल बारसे आदी उपस्थित होते. प्रकृती पूर्णतः ठीक होईपर्यंत घरीच आराम करण्याचा सल्ला महापौरांनी दिला.