‘त्या‘ मृत गायीच्या वाहतुकीची होणार चौकशी

0
मुख्य कार्यकारी अधिकारी सानम यांनी घेतली दखल
देहूरोड : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कॉम्पॅक्टर प्रकारातील अत्याधुनिक कचरा संकलक वाहनाला पाठीमागील बाजुस निर्दयीपणे लटकावून मृत गायीला नेण्यात आले होते. याबाबतचे वृत्त जनशक्तिने प्रसिध्द केले होते. त्याची मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत सानप यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना देण्यात आल्या असून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
संबंधीत कर्मचार्‍यांना कारणे दाखवा नोटीस..
पोर्टर चाळजवळ लोहमार्गालगत पॉवर हाऊस शेजारी मृतावस्थेत आढळलेल्या गायीची अत्यंत निर्दयीपणे कॉम्पॅक्टरला लटकवून वाहतुक करण्यात आली होती. या गायीची वैद्यकिय तपासणी न करताच निगडी येथील कचरा डेपोलगतच्या खड्डयात टाकून देण्यात आली होती. कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सानप यांनी याप्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. बुधवारी यासंदर्भात सानप यांची भेट घेतली असता, त्यांनी याबाबत माहिती दिली. घडलेला प्रकार अत्यंत चुकीचा व असमर्थनिय आहे, याप्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबतच्या सूचना आरोग्य निरीक्षक किरण गोंटे यांना देण्यात आल्या आहेत. त्या गाडीवर असलेले कर्मचारी व चालक यांना या प्रकाराबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
बोर्डाकडे मालमोटारच नाही…
दरम्यान, अशाप्रकारची वाहतुक करण्यासाठी बोर्डाकडे मालमोटारच उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. नुकताच काही वाहनांची लिलावाद्वारे विक्री करण्यात आली होती. त्यात बोर्डाकडील मालमोटारही विकण्यात आली. सध्या बोर्डाकडे कचरा उचलण्यासाठी केवळ दोन कॉम्पॅक्टर असून बाकी लहान वाहने, टॅ्रक्टर, घंटागाड्या खासगी ठेकेदाराकडून पुरविला जात आहेत.