’त्या’ मोटारसायकल चोरट्याने दिली अजून दोन दुचाकी चोरीची कबुली

0

चाळीसगाव – चाळीसगाव शहर पोलीसांनी मालेगाव तालुक्यातील भिलकोठ येथुन मोटारसायकल चोरास ताब्यात घेवुन त्याने चोरीच्या तब्बल 11 मोटारसायकल काढुन दिल्या होत्या त्यास पोलीसी खाक्या दाखवताच त्याने अजुन लपवलेल्या दोन मोटारसायकल काढुन दिल्या असुन अजुन काही गाड्या काढुन देण्याची शक्यता पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील व तपासी अमलदार विजय शिंदे यांनी वर्तवली असुन आरोपी अद्याप पोलीस कोठडीत आहे.

शहरातील देवरे हॉस्पिटलच्या बाहेरुन मोटारसायकल चोरुन नेणार्‍या आरोपीस मालेगाव तालुक्यातील भिलकोठ शिवारात सापळा रचुन आरोपी प्रवीण रतन सोनवणे (24) रा. राजमाने ता मालेगाव याला ताब्यात घेवून 11 मोटारसायकल ताब्यात घेतल्या होत्या. खाक्या दाखवल्यानंतर त्याने शाईन व स्प्लेंडर प्रो या दोन मोटारसायकल विक्री अथव गहाण ठेवल्या गेल्या नाही म्हणुन मालेगाव तालुक्यातील झोडगे गावाजवळ झुडुपात लपवुन ठेवल्याचे सांगीतल्यानंतर दिनांक 7 जानेवारी रोजी तपासी अमलदार पोलीस नाईक विजय शिंदे व संभाजी पाटील यांनी आरोपीस घटनास्थळी नेवुन दोन मोटारसायकल ताब्यात घेतल्या आहेत.

चाळीसगाव शहरातुन मोटारसायकल चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले होते त्यामुळे पोलीस यंत्रणा मोटारसायकल चोरांच्या शोधात होती पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि आशिष रोही, पोउनि राजेश घोळवे, युवराज रबडे, सुधीर पाटील, विजय साठे व पोलीस कर्मचारी या चोरट्यांच्या मागावर होते. पोलीसांना चोरट्यास पकडण्यात यश आले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर मोटारसायकल आरोपीसह ताब्यात घेतल्याने चाळीसगाव पोलीसांचे हे सर्वात मोठे यश मानले जात आहे. आरोपीने अजुन दोन मोटारसायकल काढुन दिल्याने आणखी काही मोटारसायकल आरोपी काढून देण्याची शक्यता पोनि रामेश्वर गाडे पाटील यांनी दैनिक जनशक्तीशी बोलतांना व्यक्त केली आहे. दरम्यान या कारवाईचे वरिष्ठांनी चाळीसगाव शहर पोलीसांचे कौतुक केले आहे.