नवी दिल्ली । गेल्यावर्षी 25 सप्टेंबर रोजी भारतीय कमांडोजनी सर्जिकल स्ट्राइक करून नष्ट केलेल्या पाकिस्तानातील त्या लाँचपँडवर आता पुन्हा दहशतवाद्यांचा राबता सुरू झाला आहे. बारामुला येथे कार्यरत असलेल्या भारतीय लष्कराच्या 19 व्या डिव्हिजनचे प्रमुख मेजर जनरल आर. पी. कलिता यांनी सांगितले की, भारतीय लष्कराच्या उरी येथील तळासमोर असलेल्या पाक अधिकृत काश्मीरमधील लाँचपॅडवर दहशतवादी परतले आहेत. उन्हाळ्यामुळे आता बर्फ विरघळण्यास सुुरुवात झाली आहे.
या काळातच पाकिस्तानी सेना दहशतवादी घुसखोरांना भारतीय सिमेत जाण्यासाठी मदत करत असते. त्यामुळे उरीपासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या नियंत्रण रेषेवरील घडामोडींवर भारतीय लष्कराचे वरिष्ठ अधिकारी लक्ष ठेवून आहेत. मेजर जनरल आर.पी. कलिता यांच्या डिव्हिजनवर काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेच्या सुमारे 100 किलोमीटर क्षेत्राच्या सुरक्षिततेची जबाबदारी आहे. उरी लष्करी तळावर केलेल्या दहशतवादी हल्लाला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राइक करत दहशतवाद्यांचे लाँचपॅड उद्ध्वस्त केले होते. मात्र, हिवाळ्याला सुरुवात होताच भारतीय लष्कराने नष्ट केलेल्या लाँचपॅडवर दहशतवाद्यांनी पुन्हा कब्जा केला आहे.
केव्हाही घुसखोरी करतात
याआधी भारतात घुसखोरी करण्यासाठी दहशतवादी उन्हाळा यायची वाट बघायचे. पण आता मात्र ते कधीही घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतात. हिवाळ्यात उरीमध्ये आणखी एकदा घुसखोरी करण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांनी केला होता. भारतीय लष्कराने तो प्रयत्न हाणून पाडला. हिवाळ्याच्या मोसमात घुसखोरी आणि भारतीय लष्कराशी चकमक करण्यासाठी दहशतवादी पर्वतारोहणासाठी वापरले जाणारे बुट, बर्फाळ प्रदेशात वापरले जाणारे कपडे अशा तयारीनिशी येतात.
मोबाइलच्या ब्ल्यूट्रूथचा वापर
गेल्या एक वर्षापासून जम्मू आणि काश्मीरमध्ये घुसखोरी करणारे दहशतवादी ब्ल्यूट्रूथ लिंकच्या माध्यमातून मोबाइल फोन रेडिओ सेटशी जोडून आपल्या हँडलरशी संपर्क साधतात. मेजर जनरल कलिता यांच्या मते गेल्या वर्षभरापासून दहशतवादी वाय-एसएमएसच्या माध्यमातून संपर्क साधत आहेत. त्यामुळे त्यांचे संभाषण पकडणे कठीण झाले आहे. अर्थात भारतीय लष्कर त्याचाही उलगडा करण्याची पद्धत शोधून काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
उरी सेक्टरमध्ये 10 लाँचपॅड
मेजर जनरल आर पी कलिता म्हणाले की, त्यांच्या अखत्यारीत येणार्या विभागामध्ये नऊ ते 10 दहशतवाद्यांचे लाँचपॅड आहेत. त्यातील काही लाँचपँडवर झोपड्या तयार करण्यात आल्या आहेत, तर काही ठिकाणी तात्पुरता निवारा उभा करण्यात आले आहेत. या ठिकाणी एकत्र येऊन दहशतवादी एखादी योजना तयार करतात आणि त्यानंतर भारतात घुसखोरी करून कारवाया करतात. उरी हल्ल्यानंतर नियंत्रण रेषा पार करुन काश्मीरमध्ये घुसखोरी करण्यासाठी नवीन क्लृप्त्या आखल्या असतील हे गृहीत धरून भारतीय लष्कराने आपली मोर्चेबांधणी केली आहे. घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात भारतीय लष्कराने पकडलेल्या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात द्रवरूप ज्वलनशील पदार्थ जप्त केले आहेत. या पदार्थांना जमिनीवर शिंपडून त्यानंतर त्याठिकाणी ग्रेनेड फोडून आग लावली जाते.