जळगाव: जम्मू-काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द झाल्यानंतर भाजप आणि कॉंग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहे. भाजपकडून कॉंग्रेसने आजपर्यंत राजकारणासाठी जम्मू-काश्मीरच्या नागरिकांचा वापर करून घेतल्याचे आरोप केले आहे तर कॉंग्रेसने भाजपवर हुकमशाहीचे आरोप केले आहे. कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा वापर पाकिस्तानकडून करण्यात आल्याचे दिसून आले आहे. यावरूनच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कॉंग्रेस व राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. पाकिस्तान राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा वापर करत आहे, याचा राहुल गांधी आणि कॉंग्रेसला लाज कशी वाटत नाही अशा शब्दात अमित शहा यांनी कॉंग्रेसला लक्ष केले आहे.
कलम ३७० हटविल्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.दहशतवाद्यांवर दबाव ठेवण्याचे काम होत आहे. त्यामुळे संपूर्ण देश या निर्णयाच्या पाठीशी आहे, मात्र काही जण राजकीय स्वार्थापोटी या निर्णयाचा विरोध करत असल्याचे आरोप केले.