कलबुर्गी: एआयएमआयएमचे माजी आमदार प्रवक्ते वारीस पठाण यांनी ‘आम्ही १५ कोटी आहोत, पण १०० कोटींना भारी आहोत, लक्षात ठेवा“ असे धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले होते. या वादग्रस्त वक्तव्याबद्दल वारीस पठान यांना कलबुर्गी पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली आहे. २९ फेब्रुवारी रोजी त्यांना तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
कलबुर्गी पोलिसात त्यांच्याविरोधात गुन्हा देखील नोंद करण्यात आला. तसेच, वारीस पठाण यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी त्यांचा शिरच्छेद करा, ही कृती करणाऱ्याला आम्ही ११ लाखांचे इनाम देऊ अशी घोषणा हक-ए-हिंदुस्थान मोर्चा या मुस्लीम संघटनेकडूनही केली गेली. वारीस पठाण देशद्रोही आहेत असे हक-ए-हिंदुस्थानच्या राष्ट्रीय संयोजक तमन्ना हाश्मी यांनी म्हटले आहे.
या अगोदर एआयएमआयएम अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी देखील वारीस पठाण यांच्यावर कारवाई केलेली आहे. वारीस पठाण यांना माध्यमांवर बोलण्यास पक्षाकडून बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आता पक्ष परवानगी देत नाही तोपर्यंत वारीस पठाण हे कोणतेही सार्वजनिक वक्तव्य करू शकणार नाहीत.