पुणे । कर्तव्य निभावत असलेल्या वाहतूक कर्मचार्याला मारहाण केल्याप्रकरणी न्यायाधीशाच्या पतीसह मुलीवर डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असे असतानाच मुलीनेही सदर वाहतूक पोलिसाविरोधात विनयभंग केल्याची तक्रार दिली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा सर्व प्रकार बुधवार (16 ऑगस्ट) रोजी कर्वे रस्त्यावर घडला होता. रवींद्र इंगळे असे त्या वाहतूक पोलिसाचे नाव आहे. याप्रकरणी एका 20 वर्षीय युवतीने तक्रार दिली आहे. फिर्यादी युवतीची आई शिवाजीनगर कोर्टात न्यायाधीश आहे. 16 ऑगस्ट रोजी फिर्यादी ही वडिलांसोबत जात असताना दुचाकी अडवल्यावरून इंगळे आणि त्यांच्यात वाद झाला होता. त्याचे रुपांतर पुढे हाणामारीत झाले होते. यावेळी इंगळे यांनी युवतीला मागे ढकलून देऊन तिचा विनयभंग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक दिपाली जाधव अधिक तपास करीत आहेत.