पोलीस करीत होते आधी केवळ दंडात्मक कारवाई
गेल्या वीस दिवसात 186 लोकांना न्यायालयात केले दाखल
वडगाव निंबाळकर : रस्त्यावरून, महामार्गावरून अनेक वाहनचालक दारू पिऊन गाडी चालवित असतात. त्यामुळे मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत. पोलीस वाहनचालकांना आर्थिक दंड करीत होते. मात्र ही दंडाची रक्कम भरूनही दारू पिऊन वाहन चालविणे हे कमी होत नाही. पुन्हा पडकडले जातात आणि पुन्हा दंड केला जातो. वाहनचालकांकडून अपघात होण्याचे प्रकारही वाढतात. त्यामुळे आता पोलिसांनी यावर नामी उपाय शोधून काढला आहे. मद्यपान करून गाडी चालविणार्यांवर आता गुन्हे दाखल होणार. आधी केवळ दंड भरून कारवाई केली जात होती. मात्र आता केवळ दंड भरून काम होणार नाही. रस्त्यावरील वाढते अपघात पाहता पोलिसांनी आता गुन्हा नोंदविण्यास सुरवात केली आहे. गेल्या वीस दिवसांत पुणे ग्रामीण पोलिसांनी 186 दारूड्या वाहन चालकांना पकडून न्यायालयात खेचले आहे. त्यामुळे आता दंडात्मक कारवाई करून सोडले जाणार नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिम
हे देखील वाचा
पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्या आदेशानुसार जिल्हा वाहतूक शाखा व जिल्ह्यातील 31 ठाण्यांमधून 1 ते 10 ऑक्टोबरपर्यंत ड्रंक अँड ड्राइव्ह मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेद्वारे प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील विविध मार्गांवर विविध वाहनचालकांची तपासणी करण्यात आली. यात दारू पिऊन वाहन चालविणार्यांची सरकारी दवाखान्यात तपासणी करण्यात आली. त्यानंतर थेट गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या मोहिमेचा खूप चांगला परिणाम दिसून येत आहे. ठराविक वेळेतील अपघात टळल्याचे प्रथमदर्शनी दिसून आल्याने मोहीम पुढे कायम ठेवण्यात आलेली आहे. विशेषतः महामार्गालगतच्या हद्दीत मद्यपींवर कारवाईचे सत्र कडक स्वरूपाचे असेल, असे संकेत पोलिसांकडून देण्यात आले आहेत. आतापर्यंत पोलिसांकडून 1 ते 21 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण जिल्ह्यात 186 मद्यपींवर गुन्हे दाखल केले आहेत. न्यायालयात उपस्थित करून या वाहनचालकांकडून 42 हजाराचा दंड वसूल केला आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याला दिवसाला ‘टार्गेट’ दिले आहे. त्यामुळे मद्यपी शोधायला पथकच असते. वेळ, काळही ठराविक नाही. दारू पिऊन वाहन चालविणारा दिसताच गुन्हा नोंदविला जातो. पहिल्यांदा दंडाची रक्कम कमी स्वरूपात असली तरी संबंधित चालक वारंवार आढळल्यास वाहन चालविण्याचा परवाना निलंबित व शिक्षा होऊ शकते.
कारवाई सुरू रहाणार
पुणे जिल्ह्याचे वाहतूक शाखा प्रमुख अरुण मोरे यांनी सांगितले की, रस्त्यावर, महामार्गावर होणार्या अपघातांमध्ये दारू पिऊन वाहन चालविणे हे प्रमुख कारण आढळून येते. अनेकदा मद्यपींवर दंडात्मक कारवाई केली जात होती. मात्र त्यामुळे यामध्ये खंड पडलेला दिसून येत नाही. त्यामुळेच आता गुन्हा दाखल करून त्यांना न्यायालयात हजर करणे हे सुरू केले आहे. तेथे त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन दंडात्मक कारवाई होते. वारंवार सापडल्यावर वाहन परवानाही रद्द होऊ शकतो. कागदपत्रे अपुरी असल्यास दंड आकारून सोडण्यात येते. पण, मद्यपी चालकांमुळे इतरांच्या जिवाला धोका होतो, ही बाब लक्षात घेऊन तत्काळ गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्यांवर यापुढेही अशीच कारवाई सुरू राहणार आहे.