‘त्या’ वृद्धाचा पोलीस बंदोबस्तात दफनविधी

0

नंदुरबार। किरकोळ वादातून झालेल्या घटनेनंतर रविवारी नंदुरबार शहर पूर्वपदावर आले. मृत पावलेल्या शब्बीर पिंजारी यांच्यावर रात्री 1 वाजेच्या सुमारास प्रचंड पोलिस बंदोबस्तात दफनविधी करण्यात आला. सध्या सर्व व्यवहार सुरू झाले असले तरी शहरात तणावपूर्ण शांतता पसरली आहे. शास्त्रीमार्केटमधील बिर्याणी विक्रेता शब्बीर पिंजारी (वय 70) हा वृद्ध पेट्रोलच्या भडक्यात जळाला होता. त्याला कारणीभूत ठरलेला सचिन मराठे याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान जळीत शब्बीर पिंजारी यांचा मृत्यू झाल्याने त्याचे पडसाद शहरात ठिकठिकाणी उमटले. शनिवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास एका गटातील संतप्त जमावाने शास्त्री मार्केट, सुभाषचौक या भागात चाल करून दगडफेक सुरू केली. त्याचे लोण शहरातील सोनारखुंट, धुळे नाका, जळका बाजार, गणपती मंदिर या भागात पसरले.

पालकमंत्र्यांनी घेतला आढावा
शनिवारी जमावाने अनेक दुकाने फोडून लुटमार केली. काही ठिकाणी आग लावण्यात आली. त्यामुळे शहरात दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पोलिसांनी बळाचा वापर करून अश्रुधुराच्या 50 हून अधिक नळकांड्या फोडल्या. दंगेखोरांची धरपकड करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सायंकाळपर्यंत शांतता पसरली होती. रात्री 12 वाजेच्या सुमारास मयत शब्बीर पिंजारी यांचे मृतदेह मुंबईहून नंदुरबारला आणले गेले. शास्त्रीमार्केट भागात यावेळी प्रचंड गर्दी जमली होती. पोलिसांच्या बंदोबस्तात 1 वाजेच्या दरम्यान मयतावर दफनविधी करण्यात आला. तत्पूर्वी पालकमंत्री जयकुमार रावल यांनी परिस्थितीचा आढावा घेवून पाहणी केली होती. काल रविवारी सकाळी सर्वत्र तणाव दिसत होता. मात्र 9 वाजेनंतर व्यवसायिकांनी दुकाने उघडण्यास सुरूवात केल्याने परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. संवेदनशिल भागात मात्र पोलिस बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे.