पिंपरी-चिंचवड : बेदम मारहाण करत अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याने गंभीररीत्या भाजलेले उद्धव आसाराम उनवणे (वय 65, रा. आळंदी. मूळ रा. नाशिक) यांचा गुरुवारी ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी त्यांची पत्नी सुमन उद्धव उनवणे, जावई ज्ञानेश्वर जयंत महाले यांच्यासह पाच जणांविरुद्ध भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही धक्कादायक घटना बुधवारी (दि. 8) रोजी दुपारी अडीचच्या सुमारास नाशिक फाट्यावर उड्डाणपुलाजवळ घडली होती. या घटनेत दुचाकीवरून आलेल्या तिघांनी उनवणे यांना बेदम मारहाण करून त्यांच्याकडील 20 हजार रुपयेदेखील लांबवले होते. त्यानंतर त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना पेटवून दिले होते. त्यामुळे उनवणे हे 40 ते 45 टक्के भाजले होते. या घटनेनंतर त्यांना पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल केले होते. तेथे प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल केले होते.
पत्नी, जावयाविरुद्ध तक्रार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उनवणे यांची पत्नी सुमन उनवणे आणि जावई ज्ञानेश्वर महाले यांनीच मारहाण करायला लावली होती, अशा आशयाची फिर्याद उनवणे यांनी दिल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु या घटनेमागचे नेमके कारण काय आहे, याचा उलगडा होऊ शकलेला नाही. पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. दरम्यान, उनवणे यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याने या गुन्ह्यात वाढीव कलम लागण्याची शक्यता असल्याचेही पोलिस अधिकार्यांनी सांगितले.