चाकण : कर्जमाफीचा ऑनलाईन फार्म भरण्यासाठी रांगेत उभे असताना शंकर मारूती ठोकळ (वय 62 वर्षे, रा. नायफड, ता. खेड, जि. पुणे) या शेतकर्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या कुटुंबाची भेट घेतली आहे. संबंधित कुटुंबास शासनाने तातडीने मदत देण्याची मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. शेतकरी संघटनेचे अभिमन्यू शेलार यांनी संबंधित शेतकरी कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी मंगळवार (दि. 22) पुण्याचे जिल्हाधिकारी, खेड उपविभागाचे प्रांतधिकारी आणि खेडचे तहसीलदार यांना शेतकरी संघटने मार्फत निवेदन देण्यात येणार असल्याचे सांगितले. संबंधित कुटुंबास तातडीने मदत न मिळाल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
दरम्यान शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले कि, शंकर ठोकळ हे अल्पभूधारक शेतकरी होते. खेड तालुक्यातील डेहणे येथील आदिवासी विकास सोसायटीमधून त्यांनी जुलै 2015 मध्ये सुमारे 62 हजार रुपये पीककर्ज घेतले होते. मात्र निसर्गाच्या लहरीपणाने शेतीचे नियोजन कोलमडल्याने जून 2017 मध्ये ठोकळ घेतलेले कर्ज भरू शकले नव्हते. त्यामुळे ते थकीत कर्जदार झाले होते. या वर्षी कर्जमाफी योजनेत ते पात्र थकीत कर्जदार झाले होते. त्यांना 75 हजार 327 रुपये कर्जमाफी मिळणार होती. त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी ते राहत्या घरापासून 20 किलोमीटर दूर असलेल्या वाडा ( ता. खेड) येथे महा ई-सेवा केंद्रात आले होते. तेथेच ताठकळत उभे राहिल्याने त्यांना चक्कर येऊन ते कोसळले. उपचारापूर्वीच त्यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला होता. त्यामुळे शासनाने या कुटुंबास मदत करण्याची गरज असल्याचे शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.