पुणे । पुणे महापालिकेच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतंर्गत (एसआरए), तसेच ‘आर 8’ अतंर्गत ताब्यात आलेल्या सुमारे चार हजार सदनिका महापालिकेकडे पडून आहेत. या सदनिका महापालिकेतील सुरक्षा रक्षकांना भाडेतत्वावर देण्यात याव्यात, असा प्रस्ताव स्थायी समिती समोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.
एसआरए योजनेच्या अंतर्गत सुमारे चार हजार सदनिका मिळाल्या आहेत. मात्र या सर्व सदनिका वापराविना पडून आहेत. काही सदनिका या रस्ता रुंदीकरणातील बाधित, तसेच प्रकल्पबाधितांना देण्यात आलेल्या आहेत. मात्र काही सदनिका पडून आहेत. त्या सुरक्षा रक्षकांना भाडेतत्त्वावर द्या, असा प्रस्ताव भाजपच्या नगरसेविका आरती कोंढरे आणि नगरसेवक दिलीप वेडे पाटील यांनी दिला आहे. स्थायी समितीसमोर याबाबतचा प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवला आहे. या कर्मचार्यांची आर्थिक स्थिती, तसेच तुटपुंजे वेतन यामुळे भाडेतत्त्वावर, तसेच हक्काचे घर घेणे त्यांना शक्य नाही. त्यामुळे त्यांना या रिकाम्या सदनिका द्याव्यात, असे या प्रस्तावात म्हटले आहे.