जळगाव। भादली येथे एकाच कुटूंबातील चौघांची निर्घृण हत्या करण्यात होती. त्यामुळे या हत्याकांडाचा तपास करण्यासाठी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बी. डी. गोरे यांच्या न्यायालयात सात जणांची नार्को टेस्ट करण्यासाठी सरकारपक्षातर्फे अर्ज दाखल केला होता. त्यावर त्यांनी त्या 7 जणांची नार्को टेस्ट करण्याची सोमवारी परवागनी दिली होती. त्या सातही जणांची मंगळवारी न्यायदान कक्षात 23 मिनिटे इन कॅमेरा चौकशी करण्यात आली. त्यात सातही जणांनी नार्को टेस्ट करण्यासाठी होकार दिला आहे.
पोलिसांतर्फे करण्यात आली होती नार्को टेस्टची मागणी
भादली येथील प्रदीप सुरेश भोळे (वय 45), पत्नी संगीता सुरेश भोळे (वय 35), मुलगी दिव्या प्रदीप भोळे (वय 8), तर मुलगा चेतन प्रदीप भोळे (वय 5) यांची 20 मार्च रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेला दीड महिना उलटला आहे. पोलिसांनी वेगवेगळ्या पद्धतीने तपास करून परराज्यात, आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये पथके पाठवली. मात्र, संशयित किंवा हत्याकांडात वापरलेले हत्यारेही पोलिसांच्या हाती लागली नाहीत. नशिराबाद पोलिसांनी या प्रकरणी एकूण 63 जणांचे जबाब घेतले आहेत. त्यातील काही साक्षीदारांनी दिलेले जबाब संशयास्पद आहेत. त्यामुळे त्यांची पॉलिग्राफ, ब्रेन मॅपिंग, नार्कोटेस्ट करण्याची मागणी पोलिसांतर्फे करण्यात आली होती. त्याला सोमवारी न्यायाधीश गोरे यांनी परवानगी दिली.
संमिती पत्रावर घेतल्या सह्या
न्यायाधीश गोरे यांनी सातही साक्षीदारांना नार्कोटेस्ट काय असते. या संदर्भात माहिती दिली. त्यात काय केले जाते, कोणत्या ठिकाणी ही टेस्ट होते. तसेच पोलिसांच्या जबाबाप्रमाणेच या चाचणीचाही जबाब असतो. हे सर्व समजावून सांगितल्यानंतर सर्व साक्षीदारांनी नार्कोसाठी होकार दिला आहे. यानंतर त्यांच्याकडून नार्कोटेस्टसाठीच्या समंतीपत्रावर सातही संशयितांच्या सह्या न्यायालयासमोर घेण्यात आल्या. याप्रकरणी सरकारपक्षातर्फे अॅड. स्वाती निकम यांनी कामकाज पाहिले.
न्यायालयात साक्षीदारांची चौकशी
फिर्यादी अलका भोळे, साक्षीदार दिनकर भोळे, पंकज भोळे, ईश्वर भोळे, दीपक खडसे, देविदास कोळी, रमेश भोळे यांची नार्कोटेस्ट, ब्रेनमॅपिंग आणि पॉलिग्राफ या तपासण्या करण्याची मागणी सरकारतर्फे अॅड. स्वाती निकम यांनी केली सोमवारी न्या गोरे यांनी नार्को टेस्टसाठी परवानगी दिल्यानंतर या सातही जणांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. प्रत्येक साक्षीदाराच्या चौकशीला सुरूवात झाली.