‘त्या’ साहित्यांचा अहवाल द्या

0

महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांचे आरोग्य विभागाला आदेश

पुणे : महापालिकेच्या रुग्णालयांसाठी खरेदी करण्यात आलेले साहित्य वर्षानुवर्षे वापराविना पडून राहत असल्याने अशा साहित्याचा अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी आरोग्य विभागास दिल्या आहेत. शुक्रवारी झालेल्या मुख्यसभेत नगरसेवक अविनाश बागवे यांनी सोनावणे हॉस्पीटलसाठी खरेदी करण्यात आलेली अत्याधुनिक डायलिसीस मशीन दोन वर्षांपासून बंद असल्याचा दावा केला होता. त्याची गंभीर दखल घेत हा अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून पालिकेच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांना चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा देण्याच्या नावाखाली, दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्चून अत्याधुनिक मशीनरी खरेदी करण्यात आली आहे. त्यात सोनोग्राफी मशीनसह डायलेसीस तसेच इतर प्रकारच्या वैद्यकीय तपासणी मशीन आहेत. मात्र, महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे या मशीनचा वापर करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर नाहीत. महापालिकेकडूने या डॉक्टरांची पदे भरण्यासाठी विनंती केली जात असली तरी शासनाकडून त्यास प्रतिसाद दिला जात नाही. भविष्यात रुग्णांना या मशीनरीची गरज भासेल असे सांगत नगरसेवकांच्या दबावातून अनेक रुग्णालयांसाठी कोट्यवधींची मशीनरी खरेदी करण्यात आली आहे. मात्र, आता त्याचा वापरच होत नसल्याने ती पडून आहे.

आरोग्य विभागाची बोलवली बैठक

मशीनरीचा वापर होत नसल्याने नगरसेवकांकडूनही वारंवार महापालिका प्रशासनास धारेवर धरले जात आहे. ही बाब लक्षात घेऊन मुख्यसभेत झालेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत अतिरिक्त आयुक्त अग्रवाल यांनी आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांच्यासह आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक घेऊन सोनावणे हॉस्पीटलसह गेल्या काही वर्षांत आरोग्य विभागाकडून खरेदी करण्यात आलेली मशीनरी, त्याचा खर्च, तसेच ती पडून राहण्याची कारणे याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना डॉ. हंकारे यांना दिल्या आहेत.