शिरपूर । अज्ञात दरोडेखोरांनी शहरातील गणेश कॉलनीतील राहणार्या एका 45 वर्षीय नफीसाबी दिदार खाटीक यांचा गळफास देऊन खून केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली होती. या खूनप्रकरणी अद्यापही तपास लागलेला नाही. दि.17 रोजी 4 वाजता नफीसाबी दिदार खाटीक यांचा दफनविधी अत्यंत शोकाकुल वातावरणात करण्यात आला. खून केल्यानंतर सोन्याचा नेकलेस दरोडेखोरांनी नेला असून बाजुला असलेले दुसरे कपाट सुध्दा तोडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मयताच्या अंगावरील दागिने तसेच सोडून ते निघुन गेल्याने तर्कवितर्क लढविले जात आहेत.
धुळ्यात झाले शवविच्छेदन
मारेकर्यांनी घरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्याचा सेटपबॉक्स नेल्यामुळे नेमके ते कोण होते? समजू शकले नाही. याबाबत शिरपूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दोन दिवस झाल्यानंतरदेखील पोलीस प्रशासनाकडून आरोपींना शोधण्यात यश आलेले नाही. ही हत्या चोरीच्या उद्देशाने झाली नसून हत्या हाच उद्देश असावा असा अंदाज वर्तविला जात आहे. दरम्यान घटनेच्या दिवशी त्या महिलेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन धुळे जिल्हा रुग्णालयात करावे अशी मागणी केल्याने दि.17 रोजी सकाळी 6 वाजता तो मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. त्यानंतर शोकाकुल वातावरणात दफनविधी करण्यात आला. या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली आहे. भर दुपारी ही घटना घडल्याने सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.