जळगाव – जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची संरक्षक भिंत तोडून तेथे व्यापारी संकुल उभारण्यातून काही पुढार्यांना 30 कोटी रुपयांचा मलिदा मिळणार असल्याचा गौप्यस्फोट खुद्द व्यापारीवर्गानेच केल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील व जिल्ह्याच्या बाहेरील ते मातब्बर ‘पुढारी’ कोण? याची जोरदार चर्चा शहरात सुरू झाली आहे.
बाजार समितीची संरक्षक भिंत पाडून तेथे भव्य व्यापारी संकुल बांधण्याच्या प्रस्तावावरून सध्या जोरदार वादळ उठले आहे. शनिवारी, सकाळी ही भिंत पाडल्यानंतर संतप्त व्यापारी वर्गाने पत्रपरिषद घेतली होती. याप्रसंगी विजय काबरा यांनी बोलताना या संपूर्ण व्यवहारातून पुढार्यांना तब्बल 30 कोटी रुपये मिळणार असल्याचा दावा करून खळबळ उडवून दिली आहे.
काबरा यांनी नाव न घेतलेले ते पुढारी कोण याची चर्चा रविवारी, दिवसभर जिल्ह्यात रंगली होती. हा केवळ एक पुढारी नसून, तिघांचे सिंडिकेट आहे. त्यांना जळगाव शहरातील काही प्रतिप्रस्थापित’ मंडळी, त्यांचे बगलबच्चे यांच्याकडून ‘रसद’ पुरवठा होत असल्याची चर्चाही ऐकायला मिळाली. या तीन पुढार्यांपैकी दोनजण जळगाव जिल्ह्यातीच तर एक जण हा बाहेरच्या जिल्ह्यातील असल्याचे म्हटले जात आहे. मातब्बर आणि वजनदार, असेही त्यांचे वर्णन केले जात आहे.
अनधिकृत कामे करणार्या बांधकाम व्यावसायिकाशी त्या पुढार्यांची जवळीक
जळगावातील मोकळ्या जागा हेरून त्या हडप करणे, अनधिकृत इमारती बांधून नंतर त्या नियमात बसविणे यासाठी प्रसिध्द असलेल्या एका बांधकाम व्यावसायिकाशी या तीन पुढार्यांची जवळीक असल्याचीही चर्चा आहे. विशेष म्हणजे या व्यावसायिकाची एका राजकीय पक्षात थेट वरपर्यंत उठबठ असून, त्याने महापालिका निवडणुकीतील निर्णय प्रक्रियेत ‘मोला’ची भूमिका बजावल्याची म्हटले जाते. तीन पुढार्यांचे सिंडिकेट आणि हा बांधकाम व्यावसायिक सध्या जळगाव शहर कसे आपल्या तालावर नाचवतात याची जोरदार चर्चा शहरात सुरू झाली आहे.
बाजार समितीशी आपला कुठलाही संबंध नाही. महापालिकेने काय पत्र दिले याची मात्र माहिती घेतली जाईल. नियमानुसार जर काही गोष्टी नसतील त्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल.
राजूमामा भोळे, आमदार, भाजप
कृषी उत्पन्न बाजार समितीची भिंत पाडली गेली. याबाबत आपल्याला कुठलीही माहिती नाही. तरी या प्रकरणाची माहिती घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल.
मेघराज राठोड, जिल्हा उपनिबंधक