‘त्या’ 50 लाखांच्या नोटा आयकर खात्याकडे

0

धुळे। आझाद नगर पोलिसांनी जप्त केलेल्या जुन्या चलनातील 50 लाख रुपयांच्या नोटा नाशिक आयकर आयुक्त कार्यालयात जमा करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली. आझादनगर पोलीसांनी कारवाईचा अहवाल व जप्त 50 लाखांच्या जुन्या नोटा आयुक्त कार्यालयाकडे सुपूर्द केल्या.

पोलिसांच्या ताब्यातील तिघा संशयितांना नाशिक आयकर आयुक्त कार्यालयात हजर राहण्याची नोटीस देऊन सोडून देण्यात आले . मात्र, त्यांचे होंडासिटी वाहन जप्त आहे. आता पुढील कारवाई आयकर विभागातील अन्वेषण विभागाचे अधिकारी करतील, अशी माहिती सुत्रांनी दिली.

सापळा रचून वाहन अडवले
जिल्हा पोलीस प्रमुख चैतन्य एस, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, डीवायएसपी हिम्मत जाधव, पोलीस निरीक्षक रमेशसिंह परदेशी यांना गुप्त माहितीनुसार एमएच 38/जे.8663 ही पांढर्‍या रंगाची गाडी शहाद्याहून धुळ्याकडे निघाल्याचे कळाले होते. पोलीस यंत्रणेने सापळा रचून नटराज टॉकीज परिसरात होंडासिटी वाहन पकडले. झडती घेतली असता त्यात े चलनातून बाद झालेल्या एक हजार व पाचशेच्या जुन्या 49 लाख 78 हजार 500 रुपयांच्या नोटा आढळून आल्या. कारसह 62 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.

संशयित भाजपशी संबंधित
पोलिसांनी शहाद्याच्या भाजप नगरसेविका योगिता संतोष वाल्हे यांचे पती संतोष वाल्हे, नगरसेविका रशिदाबी साजिद अन्सारी यांचे पती साजिद ताहेर अन्सारी, अजय लक्ष्मिकांत छाजेड यांना ताब्यात घेतले होते. आझाद नगरचे हवालदार अरुण चव्हाण, कुणाल पानपाटील, मनोज बागुल हे कर्मचारी आज नाशिककडे रवाना झाले होते. त्यांनी कारवाईचा अहवाल व जप्त जुन्या नोटा आयकर आयुक्त कार्यालयात जमा केल्याने पुढील चौकशी आयकर विभागाचे अन्वेषण अधिकारी करणार असल्याचे कळते. आयकर विभागाचे अधिकारी संतोष वाल्हे, साजिद अन्सारी व अजय छाजेड यांची चौकशी करतांना त्यांनी हे पैसे कुठून आणले होते? नाशिकला कोणाकडे जात होते? या पैशांची कुठे विल्हेवाट लावणार होते? तसेच तिघांच्या बँक खात्यांची इत्यंभूत माहिती घेतील.