‘त्या’ 72 कर्मचार्‍यांनी ज्यांच्यासाठी कलेक्टरकी केली त्या प्रभारी अधिकार्‍यांचे काय?

0

प्रभारींच्या पाठींब्यानेच कर्मचार्‍यांना बसला कलेक्टरींचा ठपका ; वाढत्या गुन्हेगारीला कारणीभूत प्रभारींवर कोण करणार कारवाई?

जळगाव- अवैधंधंद्याशी सलगी असलेल्या 72 कर्मचार्‍यांना तत्कालीन पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे यांच्याप्रमाणे पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी मुख्यालयात उचलबांगडी केली होती. आठ दिवसांचा कोर्स आटोपून ते 72 कर्मचारी आपल्या नियुक्ती असलेल्या पोलीस ठाण्यात पोहचले. मात्र ज्या प्रभारी अधिकार्‍यांच्या पाठींब्याने किंवा ज्या प्रभारी अधिकार्‍यांसाठी ते कर्मचारी कलेक्टरी करत होते, त्या प्रभारी अधिकार्‍यांचे काय? त्यांनाही पोलीस अधीक्षक कॅप्सूल कोर्सचा ’डोस’ देतील किंवा कारवाई करतीय काय? असा प्रश्‍न आता उपस्थित होत आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी कलेक्टरीचा ठपका असलेल्या जिल्हाभरातील पोलीस ठाण्यांमधील 72 कर्मचार्‍यांना मुख्यालय जमा केले. कॅप्सूल कोर्सच्या माध्यमातून आठ दिवस तज्ञ व्याख्यात्याकडून जमा केलेल्या त्या 72 कर्मचार्‍यांचे विविध विषयावर समुपदेशन करण्यात आले. आठ दिवसांचा कॅप्सूल कोर्स आटोपून हे शनिवारी 72 कर्मचारी आपआपल्या नियुक्ती असलेल्या पोलीस ठाण्यांमध्ये परतले. या कर्मचार्‍यांवर अधीक्षकांच्या ‘कॅप्सूल’ कोर्सचा ‘डोस’ किती प्रभावी ठरतो हे भविष्यात समेार येणारच आहे.

त्या वगळलेल्या आठ कर्मचार्‍यांचे काय?
तत्कालीन अधीक्षक दत्ता शिंदे यांनी जिल्हाभरातील 80 पोलीस कलेक्टरांची यादी तयार केली होती. याच यादीनुसार केवळ 72 कर्मचार्‍यांना अधीक्षक उगले यांनी मुख्यालयात जमा केले. आठ कर्मचार्‍यांना का वगळण्यात आले? हा प्रश्‍न हा आता कॅप्सूल कोर्स पूर्ण करुन परतलेल्या कर्मचार्‍यांमध्ये उपस्थित होवू लागला आहे. त्या आठ कर्मचार्‍यांना पाठीशी घालण्याचा तर प्रकार होत नाहीये ना? असा संशय निर्माण होत आहे.

प्रभारींना कारवाईच्या बुस्टर डोसची गरज
प्रभारी अधिकार्‍यांच्या मागणीनुसारच किंवा सांगण्यानुसार कर्मचारी वसूली करत असल्यानेच संबंधित कर्मचार्‍यांवर कलेक्टरीचा ठपका बसला. काही प्रभारी अधिकारी याला अपवाद असतील मात्र ज्यांच्यासाठी कर्मचार्‍यांना वसुली करावी लागते, अशा प्रभारी अधिकार्‍यांवर कारवाई करणे गरजेच आहे. प्रभारींकडून मागणीच झाली नाही तर आपोआपच पोलीस कलेक्टर संकल्पनाच संपेल. शिंदे यांनी काही पोलीस निरिक्षकांचीही मुख्यालयात उचलबांगडी केली होती. त्याप्रमाणे अधीक्षक उगलेही प्रभारींवर कारवाई करतील काय? हा प्रश्‍न अनुत्तरीत आहे. वाढती गुन्हेगारी, प्रलंबित तपास, या कारणांमुळे तरी संबंधितांना हलविण्याची किंवा जागे करण्याची गरज आहे. आमच्यावर कारवाईच होवू शकत नाही, अशा अविर्भावात वावरणार्‍यांवर कुण्या तरी बड्या व्यक्तींचा आशिर्वाद असल्यानेच त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचीही चर्चा आहे.

कोर्सला दांडी मारणार्‍यांवर होणार का कारवाई
पोलीस अधीक्षक यांनी त्या 72 कर्मचार्‍यांना तडकाफडकी मुख्यालयात हजर होण्याचे आदेश 20 रोजी काढले होेते. मात्र अधीक्षकांच्या आदेशानंतरही 72 जणांपैकी अनेक जण कोर्सला गैरहजर राहिले तर काहींनी वेगवेगळ्या कारणांनी रजा घेवून कोर्स पूर्ण केलाच नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आदेशानंतरही कोर्सला दांडी मारणार्‍या तसेच कोर्स पूर्ण न करणार्‍या संबंधितांवर पोलीस अधीक्षक काय कारवाई करतील याकडे लक्ष लागून आहे.