जळगाव । घरकुल व मोफत बस सेवा योजनेत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी आजी-माजी 48 नगरसेवकांकडून घरकुलची सुमारे 1 कोटी 16 लाखाची तर मोफत बससेवेसाठी 5 लाख 14 हजार वसुली करण्याबाबत आयुक्तांनी सुनावणी घ्यावी, असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले होते. त्यानुसार घरकुल घोटाळ्यातील आजी माजी नगरसेवकांच्या सुनावणी दरम्यान आजी- माजी नगरसेवकांना सुनावणीसाठी सोमवारी 6 मार्च रोजी महापालिकेत बोलाविण्यात आले होते़ आयुक्त जीवन सोनवणे यांच्या दालनात सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत सुनावणी सुरु होती. या प्रकरणात त्रयस्त अर्जदार दीपक गुप्ता यांनी सुनावणी दरम्यान आपली भूमिका मांडण्याची परवानगी आयुक्त सोनवणे यांच्याकडे अर्ज केला होता त्यानुसार आयुक्तांनी गुप्ता यांना परवानगी दिली होती. मात्र मुंबई येथे गुन्हा दाखल झाल्याने त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणात महत्वाची भूमिका असलेले गुप्ताच्या उपस्थित राहण्याबाबत शंका असल्याची चर्चा महापालिकेत होती.
सुनावणीसाठी आजी माजी नगरसेवकांची उपस्थिती
मोफत बस प्रकरणात महापालिकेत सोमवारी 6 मार्च रोजी आयुक्त कार्यलयात सुनावणी करण्यात आली. यावेळी या सुनावणीत आजी – माजी नगरसेवकांसह सदस्यांनी हजेरी लावली होती. यामध्ये सुनंदा चांदेलकर, साधना कोगटा, निर्मला सूर्यकांत भोसले, लता भोईटे, लीलाधर नथ्थू सरोदे, सदाशिव गणपत ढेकळे, पुष्पलता अत्तरदे, अब्दुल रज्जाक गफार मलिक, संजय राठोड, सलीम शेख इसमामुद्दीन, मीना मंधान आदींनी उपस्थिती दिली. तर इतर संशयित अरुण शिरसाळे, अलका लढ्ढा, सिंधू कोल्हे, सुधा काळे, विमल पाटील, पांडुरंग काळे, गुलाबराव देवकर यांनी वकिलाच्या माध्यमातून आपली हजेरी नोंदवली आहे.
तर्कवितकांना आला ऊत
खंडपीठाच्या आदेशानुसार घरकुल घोटाळा व मोफत बस सेवा योजनेत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी मनपाचे झालेले नुकसान वसुली करण्यासंदर्भात सुनावणी झाली. या सुनावणीत घरकुल घोटाळ्या बाबत 22 मार्च तर मोफत बससेवा संदर्भात 23 मार्च रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. यावेळी महापालिका परिसरात सुनावणी दरम्यान कोण उपस्थित राहणार याबाबत तर्कवितर्क लावले जात होते.
त्रयस्त अर्जदार म्हणणे मांडण्याबाबत शंका
घरकुल प्रकरण व मोफत बस गैरव्यवहारात सुनावणीत आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळावी, यासाठी त्रयस्त अर्जदार दिपककुमार गुप्ता यांनी आयुक्तांना परवानगीसाठी अर्ज दिला तो अर्ज आयुक्त जीवन सोनवणे यांनी मंजूर केला होता. 22 व 23 मार्च रोजी सुनावणीदरम्यान त्रयस्त अर्जदारही उपस्थित राहणार होते. मात्र विलेपार्ले येथे मुंबई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. धुळे, नाशिक, पुणे, मुंबई आणि नवी मुंबई येथील आमदारांना अश्लील संदेश पाठविल्या प्रकरणी दीपक गुप्ता (रा.शिवाजी नगर, जळगाव) यांना 28 फेब्रुवारी रोजी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते.
नगरसेवक आनंदात
न्यायालयात हजर केले असता त्यांना 4 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. न्यायालयीन कोठडी संपत आल्याने त्यांना मुंबई गुन्हे शाखा चौकशीसाठी ताब्यात घेणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. घरकुल, मोफत बस सेवा योजनेत झालेल्या गैरव्यहारात सामाजिक कार्यकर्ते दीपक गुप्ता हे त्रयस्त अर्जदार होते. पुढील महापालिकेत होणार्या सुनावणी दरम्यान त्यांच्या उपस्थित राहण्याबाबत महापालिकेत सर्वत्र चर्चा होती. मात्र न राहण्यामुळे गुप्ताच्या उपस्थितीबाबत नगरसेवकांमध्ये आनंद, उत्साह संचारला होता.