आचारसंहिता लागू, मुख्य निवडणूक आयुक्तांकडून तारखा जाहीर
नवी दिल्ली : त्रिपुरा, मेघालय आणि नागालॅण्ड या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा मुख्य निवडणूक आयुक्त अचल कुमार ज्योती यांनी जाहीर केल्या. त्रिपुरामध्ये 18 फेब्रुवारीरोजी, नागालॅण्ड आणि मेघालयात 27 फेब्रुवारीरोजी मतदान होणार आहे. या तिन्ही राज्यांमधील मतमोजणी 3 मार्चरोजी होणार असून, गुरूवारपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या तीन राज्यांत पहिल्यांदा ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात येणार आहे.
तिन्ही राज्यांत सदस्यसंख्या प्रत्येकी 60
मुख्य निवडणूक आयुक्त ए. के. ज्योती यांनी गुरूवारी दुपारी पत्रकार परिषद घेऊन तिन्ही राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. या तिन्ही राज्यांतील विधानसभेची सदस्यसंख्या प्रत्येकी 60-60 आहे. नागालॅण्डच्या विधानसभेचा कार्यकाळ 13 मार्चरोजी, मेघालयाच्या विधानसभेचा 6 मार्चरोजी आणि त्रिपुरा विधानसभेचा कार्यकाळ 14 मार्चरोजी संपुष्टात येत आहे.
राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग
दरम्यान, त्रिपुरा, मेघालय आणि नागालॅण्डमधील विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. पूर्वोत्तर राज्यात भाजप सर्वाधिक जोर लावताना दिसत आहे. निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच मेघालयामध्ये अनेक राजकीय घडामोडी सुरू झाल्यात. येथे सत्ताधारी एनपीपीच्या अनेक आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.