त्र्यंबकेश्वरमध्ये राजकीय घडामोडी गतीमान

0

त्र्यंबकेश्‍वर । आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर येथील राजकीय वर्तुळातील हालचाली गतीमान झाली असून इच्छुकांनी आपापल्या पध्दतीने मोर्चेबांधणी करण्यास प्रारंभ केला आहे. 16 नोव्हेंबर पासून ते 22 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यामुळे विद्यमानांसह इच्छुकांमध्ये मोठी चुरस दिसून येत आहे. नगरपालिकांच्या या टप्प्यात नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या. 10 डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या दोन्ही नगरपरिषदांमध्ये आजपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे. अर्थात यामुळे येथील राजकीय वर्तुळातील घडामोडींना वेग आला आहे.

नगराध्यक्षपदाची चुरस
त्र्यंबकेश्वरमध्ये एकूण 17 सदस्यांचे 6 प्रभाग आहेत. यामध्ये नगराध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले आहे. शहराची मतदार संख्या 10614 इतकी आहे. यापूर्वी 2002 मध्ये थेट नगराध्यक्ष निवड झाली होती. तेव्हा देखील बहुसदस्य प्रभाग पद्धत होती. यंदा ही निवडणूक लढविणारे इच्छुक गेल्या वर्षभरापासून तयारीत आहेत. विशेष म्हणजे नगराध्यक्षपद हे खुल्या प्रवर्गासाठी असल्यामुळे या पदासाठी प्रचंड चुरस आहे. येत आहे. राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर हे पदासाठी इच्छुक असल्याने यासाठी बहुरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. नगराध्यक्षपदासोबत विविध प्रभागांमध्ये इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. बहुतांश उमेदवारांनी थेट संपर्काला भर दिला आहे. अनेकांनी कोणताही पक्ष वा पॅनलचे तिकिट मिळण्याआधीच आपला प्रचार सुरू केला आहे. प्रचंड चुरस असल्यामुळे अनेक जण बंडाळीच्या पावित्र्यात आहेत.