गेल्या काही दिवसांत कातडीच्या बुरशीजन्य आजाराचे प्रमाण वाढले आहे. त्यावर औषध म्हणून स्टीरॉइडमिश्रित मलम लावले जात आहे. त्याचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणावर जाणवू लागले आहेत. यासाठी जर त्वचेचा त्रास होत असेल, तर तातडीने कोणती काळजी घेणे आवश्यक आहे, हे सांगण्यासाठी हा लेखप्रपंच…उन्हाळ्यात घामामुळे तर पावसाळ्यात दमटपणामुळे कोकणपट्टीत त्वचेचे बुरशीजन्य आजार मोठ्या प्रमाणात आढळून येतात. त्यांना आपण सामान्यपणे नायटा अथवा गजकर्ण म्हणतो. कोकणपट्टीतील हवामानात याचा प्रादुर्भाव अधिकच होतो.
धकाधकीचे नागरी जीवन, पाश्चिमात्य पेहराव, कृत्रिम धाग्याचे कपडे, घामाने ओल्या राहणार्या जीन्स, हवामानातील बदलामुळे वाढणारा उकाडा या सर्वांमुळे नायट्याचा त्रास होतो. डायबिटीसबाधित व्यक्तींना याचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते. परंतु, या सर्वांवर कडी करणारी एक गोष्ट सध्या प्रामुख्याने आढळते, ती म्हणजे स्टीरॉइडमिश्रित मलमे! खरे तर नायट्यावर उपाय करायचा तर बुरशीनाशक मलमे व गोळ्या द्यायला हव्यात, या औषधांमुळे रोग बरा झाल्यावर खाज कमी होते, पण पटकन खाज कमी करण्यासाठी त्या मलमांमध्ये कॉर्टिकोस्टिरॉइड थोडक्यात स्टीरॉइड औषध मिसळण्याची शक्कल औषध कंपन्यांनी काढली व त्यामुळे नायट्याची खाज त्वरित कमी होत असल्याने अशी स्टीरॉइडमिश्रित बुरशीनाशक मलमे वेगाने खपूही लागली. पण या औषधांच्या दुष्परिणामांमुळे औषधाला दाद न देणार्या व शरीरभर पसरणार्या नायट्याचा भस्मासुर उभा राहिला आहे. त्याची कारणमीमांसा आता समजावून घेऊ. बीटामीथासोन, बेक्लोमीथासोन, फ्लुओसिलोओन ही त्या स्टीरॉइड औषधांची काही नावे. ही स्टीरॉइड औषधे वेदना, खाच, सूज इ. लक्षणे कमी करतात, पण त्याबरोबर कातडीतील प्रतिकारशक्तीही दाबून टाकतात. त्यामुळे सोरियासिस, एक्झिमा अशा रोगांवर वरदान ठरलेली ही मलमे, नायट्यासारख्या रोगाला मात्र वेगाने वाढायला कारणीभूत ठरतात. नायट्याचे भलेमोठे चट्टे दिसू लागतात. नायटा प्रसंगी चेहर्यावरही येतो. पूर्वी जांघेपुरता मर्यादित राहणारा हा नायटा आता शरीराचा 30-50 टक्के भाग व्यापतो. बुरशीच्या जंतूंची संख्या अमर्याद वाढल्यामुळे एका व्यक्तीकडून दुसर्याला लीलया होऊ शकतो. अगदी तान्ह्या मुलालाही संसर्ग होतो.
पूर्वी हिवाळ्यात न दिसणारा हा त्रास बारमाही दिसू लागला आहे. पण एवढा अनर्थ चालू असताना रुग्णाची खाज मात्र स्टीरॉइडमुळे आटोक्यात असते. त्यामुळे या मलमांच्या पडद्याआड चालू असलेल्या विनाशाची त्याला कल्पनाच नसते. खरी परिस्थिती असते की, स्टीरॉइड मलमांमुळे रोग बळावतोय, पण रुग्णाला वाटत राहते की, मलम लावून खाज कमी होत आहे. पण चट्टे पूण कमी होत नाही, म्हणून रुग्ण अशा मलमांच्या ट्युबवर ट्युब आणून वापरत राहतात आणि आगीत तेल पडत राहते. या मलमांची प्रतिकारशक्ती विरोधक ताकद इतकी जास्त आहे की, जरी त्यांच्याबरोबर बुरशीनाशक गोळ्या पूर्ण डोसमध्ये दिल्या तरीही निष्प्रभ ठरतात व रोग वाढतच जातो. प्रतिकारशक्तीचा अंकुश नसलेली ही बुरशी अधिकाधिक मुजोर बनते व औषधांना दाद न देणार्या बुरशीच्या प्रजाती निर्माण करते. त्याचा त्रास सर्व समाजाला सहन करावा लागतो. त्यामुळे वैद्यकीय पुस्तकात दिलेल्या डोसपेक्षा दुप्पट डोस द्यावा लागतोय. यामुळे त्वचारोगतज्ज्ञांची झोप उडाली आहे. याविषयी प्रबोधन करण्यासाठी त्वचारोगतज्ज्ञांच्या राष्ट्रव्यापी संघटना ‘आयटाट्सा’ नावाचे मंडळ स्थापन केले आहे. हा दुरुपयोग टाळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. रुग्णांसाठी – नायट्यावरील डॉक्टरांकडून अथवा केमिस्टकडून घेताना स्टीरॉइडविरहित मलमांचा आग्रह धरा. अशा मलमांमुळे खाज आटोक्यात यायला वेळ लागली तरी रोगाचे समूळ उच्चाटन करता येईल. केमिस्ट – स्टीरॉइडमिश्रित बुरशीविरोधी औषधांचा ओव्हर द काउंटर सेल टाळा. हा नियम पाळल्याने समाज या रोगापासून मुक्त करण्यास तुमचा हातभार लागेल. डॉक्टरांसाठी – स्टीरॉइडमिश्रित अॅन्टीफंगल मलमांची प्रिस्क्रीप्शन टाळा. या मुद्द्यावर रुग्ण व नजीकचे केमिस्ट यांचे प्रबोधन करा.
– डॉ. दीपक कुलकर्णी
त्वचारोगतज्ज्ञ अलोक क्लिनीक, पनवेल.
7021821758