पुणे । थंडीचा जोर वाढत असुन लिंबाची मागणी घटत आहे. परंतु आवक मोठ्या प्रमाणात वाढली असून मागणी कमी झाल्याने लिंबाच्या दरात लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे लोणचे उत्पादकांकडून काही प्रमाणात लिंबाची खरेदी सुरु झाली आहे. थंडी आणखी वाढल्यास मागणी आणखी घटण्याची शक्यता आहे.
मार्केटयार्डात सोलापूर आणि नगर जिल्ह्यातून लिंबाची आवक होत आहे़ सध्या आवक वाढत चालली असून दररोज तब्बल 8 ते 10 हजार गोणी इतकी होत आहे. पुणे बाजारात आवक जास्त झाल्याने गुजरातमधील सुरत मार्केटमध्ये लिंबे विक्रीला पाठविण्यात येत आहेत. दरम्यान लोणचे उत्पादकांकडुन लिंबे खरेदी केली जात असुन दर कमी राहिल्यास लोणचे उत्पादकांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाईल असे व्यापारी रोहन जाधव यांनी सागितले. जाधव म्हणाले की, यंदा पाऊस चांगला झाल्याने लिंबाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले आहे़ सध्या थंडी असल्याने मागणी घटली आहे. थंडी सुरु होण्यापूर्वी ज्युसविक्रेते, रसवंती गृहांकडून लिंबांना मोठ्या प्रमाणात मागणी होत होती ती आता बंद झाल्याने दरामध्ये घसरण झाली आहे.