यावल । शहरातील सुमारे 350 जणांनी अद्यापही पालिकेचा वेगवेगळ्या प्रकारचा कर भरलेला नाही. या थकबाकीदार करदात्यांच्या मालमत्तांवर बोजा बसवण्यासाठी पालिकेने तयारी सुरू केली असून तशी यादी जिल्हाधिकार्यांकडे पाठवली जाईल. गेल्या आर्थिक वर्षात राज्य शासनाच्या करवसुली संर्दभात सक्त सुचना होत्या.
यानुसार पालिकेने वसुलीसाठी विशेष मोहीम राबवली. मात्र, तरीही शहरातील साडेआठ हजार मालमत्ता धारकांपैकी सुमारे 350 जणांनी अद्यापही कर रकमेचा भरणा केलेला नाही. परिणामी या वसुलीकडे पालिका प्रशासन गंभीरतेने पाहत आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार थकबाकीदारांच्या मालमत्तांवर बोजा बसवण्यात येईल. तरीही कर रकमेचा भरणा झाल्यास मालमत्तांचा लिलाव होईल. नंतर देखील संबधीत करदात्याने कालबाह्य कार्यक्रमात कर अदा करून बोजा कमी केल्यास सदरील मालमत्तेचा लिलाव केला जाणार आहे, असे मुख्याधिकारी सोमनाथ आढाव यांनी सांगीतले.