३१ मार्च पूर्वी वीजपुरवठा खंडीत झालेले ग्राहक लाभासाठी ठरणार पात्र
व्याज व दंडाची रक्कम शंभर टक्के माफ होणार
भुसावळ । घरगुती वा कृषी ग्राहकांचा विद्युत पुरवठा थकबाकीसह अन्य कारणांमुळे खंडित झाला असल्यास त्यांना अभय योजनेतून मोठा दिलासा मिळणार आहे. ३१ मार्च २०१७ रोजी किंवा त्यापूर्वी थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित झालेल्या घरगुती तसेच कृषी ग्राहक या योजनेच्या लाभासाठी पात्र ठरणार आहेत.
थकबाकीची रक्कम पाच हफ्त्यात भरण्याची विशेष सवलत
३१ मार्च २०१७ रोजी असलेले संपूर्ण व्याज व दंड शंभर टक्के माफ होणार असून वीजपुरवठा खंडित केलेल्या तारखेला जी मूळ थकबाकी असेल ती जुन्या सुरक्षा ठेवीची रक्कम मूळ थकबाकीतून वजा केल्यानंतर शिल्लक राहिलेल्या थकबाकीची रक्कम पाच समान हफ्त्यात भरण्याची विशेष सवलत तसेच पहिला हफ्ता व पुनर्रजोडणी आकार भरून वीज जोडणी पूर्ववत केली जाणार आहे.
ग्राहकांनी लाभ घ्यावा
या योजनेंतर्गत थकबाकीचे उरलेले चार हफ्ते चालू बिलाबरोबर भरण्याची सोयदेखील उपलब्ध असून ३१ मार्च २०१८ पर्यंत या योजनेचा लाभ घेता येणार आहे. दरम्यान, वीजपुरवठा जोडणी खंडित करण्याकरीता सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला असेल तर नियमानुसार नवीन वीज जोडणीचा आकार भरणे आवश्यक राहील. सर्व घरगुती तसेच कृषी वीजपुरवठा खंडित ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन वीज वितरण कंपनीतर्फे करण्यात आले आहे.