थकबाकीदारांना महावितरणचा ’शॉक’!

0

‘शून्य थकबाकी’ मोहीम; 33 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

बारामती । थकबाकी वसुलीसाठी महावितरणच्या बारामती परिमंडलात ’शून्य थकबाकी’ मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत थकबाकीदार 33 हजार 368 घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांचा वीजपुरवठा गेल्या पंधरवड्यापासून खंडित करण्यात आला आहे. दरम्यान, ही मोहीम सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार असल्याने 25 फेब्रुवारीला महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू ठेवण्यात येणार आहे. 10 कोटी 28 लाख रुपयांच्या थकबाकीपोटी बारामती, सातारा व सोलापूर मंडलात 33 हजार 368 वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

1 कोटीची थकबाकी
बारामती मंडलांतर्गत बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, पुरंदर व भोर तालुक्यातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक अशा 3 हजार 294 थकबाकीदारांचा वीजपुरवठा 2 कोटी 96 लाख रुपयांच्या थकबाकीपोटी खंडित करण्यात आला आहे. सातारा मंडलातील 7 हजार 31 थकबाकीदारांचा वीजपुरवठा 1 कोटी 33 लाखांच्या थकीत वीजबिलांमुळे खंडित करण्यात आला आहे. तर सोलापूर मंडलातील 23 हजार 43 थकबाकीदारांचा वीजपुरवठा 5 कोटी 99 लाखांच्या थकीत वीजबिलांमुळे खंडित करण्यात आला आहे.

बिलांचा भरणा करण्याचे आवाहन
या मोहिमेमुळे थकबाकी व चालू वीजबिलांचा ग्राहकांना भरणा करता यावा म्हणून बारामती परिमंडलातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र रविवारी 25 फेब्रुवारीला सुट्टीच्या दिवशी सुरू राहणार आहेत. वीजग्राहकांकडे किती रक्कम थकीत आहे हे न पाहता वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळण्यासाठी थकीत वीजबिलांचा त्वरीत भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. घरबसल्या ’ऑनलाईन’ पेमेंटसाठी महावितरणची www.mahadiscom.in ही वेबसाईट तसेच मोबाईल अ‍ॅपचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.

पर्यवेक्षणासाठी विशेष पथके
बारामती परिमंडलातील शहरांसह ग्रामीण भागात थकबाकीदार ग्राहकांच्या वीजजोडण्या खंडित करण्याचे व सुट्टीच्या दिवशीसुद्धा ही कारवाई आक्रमकपणे सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचे पर्यवेक्षण करण्यासाठी प्रादेशिक कार्यालयातील अधिकार्‍यांचे विशेष पथक शनिवारी व रविवारी बारामती परिमंडलात विविध ठिकाणी भेटी देऊन थकबाकीदारांविरुद्ध सुरू असलेल्या कारवाईबाबतचा अहवाल वरिष्ठांकडे सोपविणार आहे.