थकबाकीमुळे ‘पीएमपी’ आता ‘गॅस’वर

0

‘सीएनजी’ गॅसच्या पुरवठ्याचा प्रश्‍न : 34 कोटींचे बिल थकविले; ‘एमएनजीएल’चे मागणीचे पत्र

पुणे : आर्थिक अडचणींचा सामना करणार्‍या पुणे महानगर परिवहन महामंडळासमोर (पीएमपी) आता सीएनजी पुरवठ्याचा प्रश्‍न उभा राहिला आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे 34 कोटींचे बिल पीएमपीने थकविले असून ते तत्काळ भरण्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे पीएमपीच्या अडचणी वाढल्या आहेत. पीएमपीच्या ताफ्यात सुमारे 1,235 बस सीएनजीवर चालणार्‍या असून यासाठी एमएनजीएलकडून दररोज सुमारे 30 लाख रुपयांचा सीएनजी पुरवठा केला जातो. मागील काही महिन्यांपासून सीएनजी पुरवठा केल्यानंतर एमएनजीएलची बिले थकली आहेत.

थकीत रक्कम भरण्याची मागणी

सध्या ही थकबाकी 34 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. यासंदर्भात एमएनजीएलकडून यापूर्वी पीएमपीला पत्रव्यवहार केला. यानंतर पीएमपीने 27 नोव्हेंबर रोजी 5 कोटी रक्कम एमएनजीएलकडे भरले. मात्र, तरीही जवळपास 34 कोटींची थकबाकी असून ती सहन आवाक्याबाहेर जात असल्याचे एमएनजीएलचे म्हणणे आहे. यामुळे लवकरात लवकर थकीत रक्कम भरावी, अशी मागणी पीएमपीकडे करण्यात आली आहे.

1235 बस सीएनजीवर

थकबाकीची रक्कम आवाक्याबाहेर गेल्याने अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे एमएनजीएलकडून सांगण्यात आले. पीएमपीच्या ताफ्यातील 1235 बस सीएनजीवर चालतात. या बससाठी एमएनजीएलकडून दररोज सुमारे 30 लाख रुपयांचा सीएनजी पुरवठा केला जातो. मागील काही महिन्यांपासून सीएनजीचा पुरवठा करूनही पीएमपीने एमएनजीएलचे बिल थकवलेले आहे. याबाबत एमएनजीएलने पीएमपीला कळविले होते. त्यानंतर पीएमपीने काही रक्कम जमा केली. मात्र, तरीही सुमारे 34 कोटींची थकबाकी असून, ती एमएनजीएलला सोसणे आवाक्याबाहेर जात आहे.

दैनंदिन सेवा विस्कळित होण्याची चिन्हे

आर्थिक अडचणींचा सामना करणार्‍या पीएमपीसमोर आता सीएनजी पुरवठ्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. पीएमपीला सीएनजी पुरवठा करणार्‍या महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे (एमएनजीएल) 34 कोटी रुपयांचे बिल थकले आहे. ही रक्कम तत्काळ न भरल्यास सीएनजीचा पुरवठा थांबविण्यात येईल, असा इशारा एमएनजीएलने दिला आहे. त्यामुळे पीएमपीची
दैनंदिन सेवा विस्कळित होण्याची चिन्हे आहेत.

एमएनजीएलला 5 कोटी दिले

पीएमपीकडून सीएनजी पुरवठ्याची थकीत रक्कम वेळोवेळी एमएनजीएलला दिली जाते. पीएमपीने एमएनजीएलला नुकतेच 5 कोटी रुपये दिले आहेत. उर्वरित रक्कमदेखील लवकरच देण्यात येईल. सुभाष गायकवाड, जनसंपर्क अधिकारी, पीएमपी

करारात ठरल्याप्रमाणे रक्कम द्यावी

एमएनजीएललाही गॅस खरेदी केलेल्या कंपनीला वेळोवेळी पैसे द्यावे लागतात. अशा परिस्थितीत पीएमपीकडून थकविण्यात आलेली रक्कम मोठी आहे, त्यामुळे एमएनजीएलला गॅस खरेदी करण्यात अडचणी येत आहेत. व्यवहार सुरळीत चालण्यासाठी करारात ठरल्याप्रमाणे रक्कम पीएमपीने वेळोवेळी द्यावी.
संतोष सोनटक्के, वरिष्ठ अधिकारी, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड