पुणे । कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या घरगुती व कृषी ग्राहकांसाठी महावितरणने नवीन ‘अभय योजना’ जाहीर केली असून यात ग्राहकाला मूळ थकबाकीची रक्कम पाच हप्त्यांत भरण्याची सवलत राहणार आहे. तसेच थकीत रक्कमेवरील व्याज व विलंब आकार १०० टक्के माफ करण्यात येणार आहे.
महावितरणच्या ज्या घरगुती व कृषी ग्राहकांचा वीज पुरवठा ३१ मार्च २०१७पूर्वी कायमस्वरुपी खंडित करण्यात आलेला आहे. अशा ग्राहकांसाठी ही नवीन योजना सुरू करण्यात आली असून योजनेत सहभागी होणार्या ग्राहकांच्या मूळ थकीत रकमेची पाच हप्त्यांत विभागणी करण्यात येणार आहे. त्यांपैकी मूळ थकीत रकमेचा पहिला हप्ता व वीज जोडणीसाठी आवश्यक असणारी रक्कम भरल्यानंतर ग्राहकाचा वीजपुरवठा सुरू करण्यात येईल.
उर्वरित मूळ थकबाकीच्या चार हप्त्यांचा भरणासंबंधित ग्राहकाने मासिक वीजबिल सोबत भरणे आवश्यक आहे. ग्राहकांनी थकीत रकमेचा पूर्णभरणा निर्धारित पाच हप्त्यांत पूर्ण केला तरच संबंधित ग्राहकाला थकीत रक्कमेवर व्याज व विलंब आकारात १०० टक्के माफी मिळणार आहे. कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केलेल्या कृषी व घरगुती ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या नजिकच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.