थकबाकी न भरल्याने भुसावळातील शासकीय विश्रामगृहाचा वीजपुरवठा कट

0

भुसावळ (प्रतिनिधी)- थकबाकी न भरल्याने अनेकदा सर्वसामान्यांकडील वीजपुरवठा कट होण्याच्या घटना तशा नवीन नाहीत मात्र चक्क सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणार्‍या शहरातील यावल रोडवरील शासकीय विश्रामगृहाचा चक्क थकबाकी न भरल्याने सोमवारी वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शासकीच विश्रामगृहाकडे एक लाखांचे वीज बिलापोटी थकबाकी आहे मात्र ही थकबाकी भरली जात नसल्याने वीज कंपनीने थेट सोमवारी वीजपुरवठा खंडित केल्याने विश्रामगृहाच्या आवारात अंधार पसरला आहे.

तर लोकप्रतिनिधींना अंधारात राहण्याची वेळ
वर्दळीच्या रस्त्यावर असलेल्या शासकीय विश्रामगृहात नेहमीच आमदार, खासदार, माजी मंत्र्यांचा राबता असतो शिवाय अनेक बैठकांच्या केंद्रस्थानी विश्रामगृह राहिले आहे त्यामुळे आता या विश्रामगृहाचा वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर रात्री-बेरात्री लोकप्रतिनिधी आल्यास त्यांनादेखील अंधारात रात्र घालावी लागणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एकूणच अनास्थेविषयी आश्‍चर्यवजा संताप व्यक्त होत आहे.