थकबाकी न भरल्यास जप्तीची कारवाई

भुसावळच्या मुख्याधिकार्‍यांचा इशारा

भुसावळ – शहरातील नागरिकांकडे मालमत्ता कर आणि पाणीपट्टीची मोठ्या प्रमाणावर थकबाकी आहे. मार्च अखेरपर्यंत थकबाकीदार नागरिकांनी ही थकबाकी भरावी अन्यथा मालमत्ता जप्ती केली जाईल असा इशारा भुसावळचे मुख्याधिकारी महेंद्र कठोरे यांनी दिला आहे.
भुसावळ पालिका प्रशासनातर्फे मालमत्ता करासह पाणीपट्टीच्या थकबाकीपोटी कराचा भरणा करावा म्हणून आवाहन करण्यात आले आहे. शहरातील थकबाकीदारांकडे जवळपास ३२ कोटीची थकबाकी असुन ही थकबाकी मार्च अखेरच्या आत भरणे बंधनकारक आहे. यासंदर्भात पालिका प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे. तरी देखिल जे नागरिक कराचा भरणा करणार नाही अशांची नावे प्रसिध्द करून त्यांच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी महेंद्र कठोरे यांनी दिली आहे. नागरिकांनी कारवाई टाळण्यासाठी आपल्या कराचा भरणा त्वरीत करावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.