यंदा 100 टक्के वसुलीचे उद्दीष्ट्य : वैभव आवारे यांची माहिती
तळेगाव दाभाडे । तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने कर वसुलीची धडक मोहीम हाती घेतली असून यावर्षी 100 टक्के वसुली करण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुख्याधिकारी वैभव आवारे यांनी सांगितले.यावर्षी घरपट्टीची 16 कोटी 44 लाख रुपये तर पाणी पट्टीची 5 कोटी 10 लाखांची थकबाकी आहे. आतापर्यंत घरपट्टीची 8 कोटी 54 लाख तर पाणीपट्टी पोटी 1 कोटी 55 लाख रुपये वसूल करण्यात आले असल्याची माहिती कर संकलन अधिकारी विजय भालेराव यांनी सांगितले.
विभागवार वसुली मोहीम
शहरात एकूण 28 हजार मालमत्ताधारक असून 16 हजार नळ जोड आहेत. कर वसुलीसाठी नगरपरिषदेकडून धडक मोहीम हाती घेण्यात आली असून शहराचे एकूण आठ विभाग करण्यात आले आहेत. या प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र अधिकारी आणि कर्मचारी वर्ग देण्यात आला असल्याचे मुख्याधिकारी आवारे यांनी सांगितले. करनिरीक्षक भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली करवसुली अधिकारी संभाजी भेगडे, सुनील कदम, प्रवीण माने, तुकाराम मोरमारे, प्रशांत गायकवाड, विलास वाघमारे, विशाल लोणारी, आदेश गरुड विशेष प्रयत्नशील आहेत.
मोठ्या थकबाकीदारांना जप्तीची नोटीस
सर्व मालमत्ताधारकांना घरपट्टी आणि पाणीपट्टी बिलांचे वाटप करण्यात आले असून मोठ्या थकबाकीदारांची विशेष यादी तयार करण्यात आली आहे. त्यांना जप्तीची नोटीस बजावण्यात आले असल्याचे भालेराव आणि आवारे यांनी सांगितले. नागरिकांनी आपापले कर येत्या मार्च अखेर पूर्ण भरून विकासाच्या कामात योगदान द्यावे, असे आवाहन नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, उपनगराध्यक्ष सुनील शेळके आणि सर्व नगरसेवकांनी केले आहे.